राज्याचे मंत्रीच मराठीचे मारेकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:12 AM2021-07-31T04:12:00+5:302021-07-31T04:12:00+5:30
पुणे : एखाद्या पत्रकार परिषदेत वार्ताहरांनी हिंदीत बोलण्याचा आग्रह धरला की आपले मंत्री ताबडतोब हिंदीमध्ये बोलण्यास सुरुवात करतात. महाराष्ट्राचे ...
पुणे : एखाद्या पत्रकार परिषदेत वार्ताहरांनी हिंदीत बोलण्याचा आग्रह धरला की आपले मंत्री ताबडतोब हिंदीमध्ये बोलण्यास सुरुवात करतात. महाराष्ट्राचे मंत्रीच मराठीचे मारेकरी आहेत, अशी टीका ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी केली.
अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या ‘प्राजक्तप्रभा’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन रामदास फुटाणे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, ग्रंथालीचे शिरीष वीरकर, अक्षरधाराचे रमेश व रसिका राठिवडेकर उपस्थित होते.
कर्नाटकचे मंत्री त्यांच्याच भाषेत बोलतात. मात्र, महाराष्ट्रातील मंत्र्यांनाच मराठीचे वावडे आहे, अशी शाब्दिक तोफ डागत ज्यांच्या हातात लेखणी आहे, अशा साहित्यिक व पत्रकारांची जबाबदारी वाढली असून, सांस्कृतिक पडझड थांबविण्याचे काम त्यांनीच केले पाहिजे, असे फुटाणे यांनी सूचित केले.
प्रा. जोशी म्हणाले, राजकारणात हायकमांडचे ऐकावे लागते. नाट्यचित्रपट क्षेत्रात लेखक, दिग्दर्शक आणि निर्मात्यांचे मत विचारात घावे लागते कवीचे तसे नसते. कविता हीच कवीची सार्वभौम सत्ता असते. ग्लॅमरच्या विश्वात राहूनही प्राजक्ता माळी यांना कवितेचे बोट धरावेसे वाटते ही महत्वाची गोष्ट आहे.
प्राजक्ता हिने पुण्यात प्रकाशन समारंभ होत असल्याचा आनंद व्यक्त करत तिला कविता कशा सुचल्या व आलेल्या अनुभवातून त्या कशा लिहिल्या गेल्या हे मनोगतात व्यक्त केले. रसिका राठिवडेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आर. जे. शोनाली हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
फोटो - प्राजक्ता माळी