महसूल राज्यमंत्री सत्तारांचा पारा चढला, कार्यक्रम सोडून गेले निघून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:14 AM2021-08-29T04:14:55+5:302021-08-29T04:14:55+5:30
पारगाव तर्फे आळे (ता. जुन्नर) येथे शुक्रवारी ‘ग्रामसंसद’ या ग्रामपंचायतीच्या ग्रामसचिवालय इमारतीच्या उद्घाटनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ...
पारगाव तर्फे आळे (ता. जुन्नर) येथे शुक्रवारी ‘ग्रामसंसद’ या ग्रामपंचायतीच्या ग्रामसचिवालय इमारतीच्या उद्घाटनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, माजी आमदार शरद सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, देवदत्त निकम, सरपंच लता चव्हाण, उपसरपंच रामदास तट्टू मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम सुरू करण्यासाठी सर्वजण आमदार अतुल बेनके यांच्या प्रतीक्षेत होते. दरम्यान, आमदार बेनके वाटेत असून ते लवकरच कार्यक्रमस्थळी पोहोचणार असल्याचे गृहीत धरून कार्यक्रम सुरू करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे एक स्थानिक नेते माईकवर बोलत असताना अचानक माईक बंद झाला. दरम्यान माईक बंद करा, असे कुणीतरी सांगितले असल्याने, यावेळी माईक बंद झाल्याची चर्चा सुरू झाली. त्याचवेळी राज्यमंत्री सत्तार यांचा पारा चढला. त्यांनी थेट व्यासपीठावर असलेलेल्या नेते मंडळींजवळ नाराजी व्यक्त केली. तसेच माझ्यामुळे अडचण होत असेल तर मी निघून जातो असे म्हणत सत्तार भर कार्यक्रमातून निघून गेले. या घटनेमुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात होते.
थोड्याच वेळात आमदार अतुल बेनके कार्यक्रमस्थळी पोहोचले. त्यांनी कार्यक्रमास येण्यास उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविषयी गौरवोद्गार काढले. यामध्ये राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची व माजी खासदारांची त्यांच्या नेते मंडळींची अजिबात चूक नाही. त्यांचा अवमान गावाने केलेला नाही तर त्यांचा अवमान त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचे आमदार बेनके यांनी सांगितले.
यावेळी सभापती विशाल तांबे, बाजार समितीचे सभापती संजय काळे, शरद लेंडे, राजश्री बोरकर, मोहित ढमाले, प्रदीप पिंगट, अशोक घोडके, गणपत फुलवडे, बाळासाहेब खिल्लारी आदी उपस्थित होते.
काय घडले कार्यक्रमात...
जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे हे देखील या कार्यक्रमास हजर होते. या संदर्भात त्यांना विचारले असता ते म्हणाले, ग्रामसंसद या नवीन इमारतीसाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार आले होते. परंतु तालुक्याचे विद्यमान आमदारांना कामानिमित्ताने वेळेत न आल्याने कार्यक्रम सुरू करून घेवू व तालुक्याचे आमदार आल्यानंतर उद्घाटन करू, असे सांगण्यात आले. त्यानुसार कार्यक्रम सुरू झाला पण पहिल्याच भाषणावेळी दोन ते तीन वेळा माईक बंद करण्यात आला. यासंदर्भात व्यासपीठावरील काही मान्यवरांनी स्पिकर ऑपरेटला विचारले असता माईक का बंद करत आहात, तेव्हा त्याला कोणीतरी माईक बंद कर म्हणून फोनवरून सांगितले. त्यामुळे त्याने माईक बंद केल्याचे समाेर आले. या कारणामुळे राज्यमंत्री सत्तार नाराज झाले. ‘‘माझ्यामुळे अडचण होत असेल तर मी निघून जातो’’, असे म्हणत ते उद्घाटन न करता निघून गेले. मंत्र्यांच्या कार्यक्रमात माईक बंद करणे हा त्यांचा अपमान नसून हा जुन्नर तालुक्यातील जनतेचा अपमान असल्याचे सोनवणे म्हणाले.
२८ बेल्हा
कार्यक्रमातून निघून जाताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार