केबलचालकांना कर भरण्यास मंत्र्यांकडूनच मुदत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2016 01:21 AM2016-03-02T01:21:39+5:302016-03-02T01:21:39+5:30

करमणूक कर थकबाकी व विनापरवाना केबलचालकांना जिल्हा प्रशासनाने सील ठोकले आहे; परंतु सर्व केबलचालकांनी प्रशासनाच्या या कारवाईच्या विरोधात थेट महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचेच दार ठोठावले

Ministers extend deadline to pay taxes to the taxpayers | केबलचालकांना कर भरण्यास मंत्र्यांकडूनच मुदत वाढ

केबलचालकांना कर भरण्यास मंत्र्यांकडूनच मुदत वाढ

Next

पुणे : करमणूक कर थकबाकी व विनापरवाना केबलचालकांना जिल्हा प्रशासनाने सील ठोकले आहे; परंतु सर्व केबलचालकांनी प्रशासनाच्या या कारवाईच्या विरोधात थेट महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचेच दार ठोठावले असून, खडसे यांनी केबलचालकांना १५ दिवसांची मुदत वाढ दिली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाचे काम सोपे झाले असून, पंधरा दिवसांनंतर कर न भरल्यास शासकीय मालमत्तेच्या अपहार कलमाखाली थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.
जिल्हा करमणूक कर विभागाच्या वतीने वेळोवेळी नोटिसा देऊनदेखील कराची थकबाकी व पोस्टाचा परवाना न घेतल्याने हातवे केबलसह डेन आणि इन केबलचालकांनी शासनाचा कोट्यवधी रुपयांचा कर थकविला आहे. यामुळे जिल्हा करमणूक कर अधिकारी सुषमा पाटील यांनी तीनही केबलचे कंट्रोल रूम सील केली असून, कराची थकबाकी व परवाना घेतल्याशिवाय सील काढणार नसल्याचे सांगितले. सध्या आशिया क्रिकेट कप आणि प्रो कबड्डी सुरू असतानाच ही कारवाई झाल्याने तब्बल दीड लाखापेक्षा अधिक ग्राहकांना फटका बसला आहे. केबलचालकांना ग्राहकांनी धारेवर धरले आहे. यामुळेच सर्वच केबल- चालकांनी थेट महसूल मंत्र्यांकडेच धाव घेतली.
मागील आठवड्यात एकनाथ खडसे विविध विषयावर आढावा बैठका घेण्यासाठी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते; परंतु अचानक तब्येत बिघडल्याने सर्व बैठका रद्द करण्यात आल्या. दिवसभर त्यांनी येथील व्हीव्हीआयपी सर्किट हाऊसमध्ये आराम केला. याचवेळी सर्व केबलचालक खडसे यांची भेट घेण्यासाठी दिवसभर सर्किट हाऊसमध्ये बसून होते. अखेर सायंकाळी उशिरा खडसे यांनी केबल- चालकांना वेळ दिली. तेव्हा प्रशासनाकडून विनाकारण त्रास दिला जात असून, वेळोवेळी कंट्रोल रूम सील केली जात असल्याचे सांगितले. यावर येत्या पंधरा दिवसांत सर्व कर भरा, त्यानंतर कोणतीही सवलत मिळणार नसल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले. यामुळे जिल्हा प्रशासनाची सोयच झाली असून, पंधरा दिवसांमध्ये कराची थकबाकी न भरल्यास थेट गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले.

Web Title: Ministers extend deadline to pay taxes to the taxpayers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.