"एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी, त्याशिवाय सरकारला कळणार नाही"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:08 AM2021-07-05T04:08:24+5:302021-07-05T04:08:24+5:30
P पुणे : सरकारला माझा तळतळाट लागणार आहे. एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी. त्याशिवाय त्यांना मुलगा जाण्याचे दुःख ...
P
पुणे : सरकारला माझा तळतळाट लागणार आहे. एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी. त्याशिवाय त्यांना मुलगा जाण्याचे दुःख काय असते हे कळणार नाही, असा हंबरडा फोडत स्वप्नीलच्या आईने दुःख व्यक्त केले. मंत्र्यांची मुले सुरक्षित आहेत. त्यांना अशा सामान्य मुलांचं काही घेणदेणं नाही, असा आरोपही त्यांनी या वेळी केला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत उत्तीर्ण होऊनही अद्याप नोकरी नसल्याच्या तणावातून व आर्थिक परिस्थितीतून स्वप्नील लोणकर तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ‘एमपीएससी मायाजाल आहे, यात पडू नका’ असे स्वप्निलने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट म्हटले आहे. त्याने २०२० मध्येही एमपीएससीची परीक्षा दिली होती. त्यातील पूर्वपरीक्षा तो उत्तीर्ण झाला होता. वाढते वय आणि नोकरी करूनही कधीही फिटू न शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या व इतरांच्या वाढत्या अपेक्षा या सगळ्या तणावातून त्याने आत्महत्या केल्याचे त्याच्या सुसाईड नोटवरून दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर कुटुंबीयांशी ‘लोकमत’ने संवाद साधला.
''गेली दोन वर्षे कोणतीच परीक्षा झाली नाहीये. विद्यार्थी आता हतबल झाले आहेत. विद्यार्थ्यांना एक प्रकारचं नैराश्य आलंय. त्यामुळे सरकारला आता तरी जाग आली पाहिजे. आज आपल्यातून एक स्वप्निल गेला… आमच्यावर जे संकट आलंय… ते इतर कुणावर यायला नको”, असं स्वप्नीलचे कुटुंबीय म्हणाले.
---------------
सरकारनेच त्याला आत्महत्येस प्रवृत्त केले
स्वप्नील दोन वर्षांपासून मला सांगत होता की आई परीक्षेत पास झालो, पण अजूनही मुलाखतीला बोलावले नाही. त्याने खूप प्रयत्नही केले होते, पण यश हाती आले नाही. एखाद्या मंत्र्यांच्या मुलाने आत्महत्या केल्यावरच सरकारला जाग आली असती का? असा प्रश्न स्वप्निलच्या आईने उपस्थित केला. सरकारने दुसऱ्यांच्या आईवडिलांचाही विचार करावा. नुसतं राजकारण करत बसू नये. आम्ही हुशार मुलाला गमावले आहे. सरकारनेच त्याला आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याचेही त्या म्हणाल्या आहेत.
----------