पुणे विमानतळावरील OLS सर्वेक्षणाला संरक्षण खात्याची मंजुरी, धावपट्टी विस्ताराच्या कामास वेग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 10:34 AM2024-06-25T10:34:08+5:302024-06-25T10:34:59+5:30
पुण्यातून मोठ्या विमानांची आंतरराष्ट्रीय उड्डाणे होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे...
पुणे : लोहगाव येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टी विस्तारासाठी आवश्यक असलेल्या बहुप्रतीक्षित ओएलएस सर्वेक्षणाला संरक्षण मंत्रालयाने मंजुरी दिली. यामुळे पुण्यातून मोठ्या विमानांची आंतरराष्ट्रीय उड्डाणे होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
पुणे विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार करण्याबाबत पुण्याचे खासदार आणि केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत संरक्षणमंत्र्यांना पत्र लिहिले हाेते. तसेच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेटही घेतली होती. मुख्य सचिवांचीही या प्रकरणी भेट घेतली होती. त्यानंतर संरक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ओएलएस सर्वेक्षण करण्यास परवानगी देण्याचा निर्णय झाला. या सर्वेक्षणामुळे धावपट्टीचा विस्तार करणे शक्य होईल व मोठ्या आकाराच्या विमानांना पुण्यातून उड्डाण करता येईल.
पुणे विमानतळाची सध्याची धावपट्टी भारतीय हवाई दलाच्या मालकीची असल्याने हा विषय संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारित येतो. भारत सध्या जगातील तिसऱ्या क्रमांकाची देशांतर्गत नागरी विमान वाहतूक बाजारपेठ आहे. त्यातही पुणे विमानतळ हे प्रवाशांची वर्दळ असलेल्या व्यग्र विमानतळांच्या यादीत नवव्या क्रमांकावर आहे. गेल्यावर्षी ८० लाखांहून अधिक प्रवाशांनी पुणे विमानतळावरून प्रवास केला. भविष्यात ही वाढ कायम राखण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांसह विमानतळाचा रन वे (धावपट्टी) वाढविण्याची आवश्यकता आहे.
युरोपीय देश, अमेरिका, जपान या देशांशी थेट आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी उपलब्ध नसल्यामुळे शहराच्या वाढीवर त्याचा गंभीर परिणाम होत आहे. मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानांवर छोट्या धावपट्टीमुळे इथून उड्डाण घेण्यास मर्यादा येत आहेत. या महाकाय विमानांची (कोड डी/ई प्रकारची विमाने) हालचाल सुलभ करण्यासाठी सध्याच्या धावपट्टीचा विस्तार करण्याची गरज होती. मात्र, आता संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंजुरी दिल्याने पुणे विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार होईल व मोठ्या आकाराची विमानेही इथून उड्डाण घेऊ शकतील.
मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री, नागरी विमान वाहतूक व सहकार