अल्पवयीन सराईत गुन्हेगाराचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 12:42 AM2018-12-01T00:42:18+5:302018-12-01T00:42:22+5:30
तुषार भापकर या अल्पवयीन गुन्हेगारावर यापूर्वी जबरी चोरी, मारामारी असे अनेक गुन्हे दाखल आहेत
हडपसर : कोयता हातात घेऊन फिरणे, महिलांची छेड काढणे, दहशत माजवणे अशा अल्पवयीन गुन्हेगाराच्या उपद्व्यापामुळे मांजराईनगरमधील शिनगारे कुटुंबीय वैतागले होते. शिनगारे यांच्या बांधकामासाठी आणलेल्या विटा तोडल्यानंतर अखेर शिनगारे कुटुंबातील तीन भावांनी मिळून धारदार शस्त्राने वार करून तुषार मोहन भापकर या अल्पवयीन सराईत गुन्हेगाराचा खून केला. ही घटना बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मांजरी गाव येथे घडली.
याप्रकरणी हडपसर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केलेली आहे. सनी दिनकर शिनगारे (वय २९), विनोद दिनकर शिनगारे (वय २७), दादा ऊर्फ महेश दिनकर शिनगारे (वय २६, सर्व रा. मांजराईनगर, मांजरी बुद्रुक) या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे. तुषार भापकर या अल्पवयीन गुन्हेगारावर यापूर्वी जबरी चोरी, मारामारी असे अनेक गुन्हे दाखल आहेत. हातात कोयता घेऊन फिरणे दहशत माजवणे, नशाबाजी करणे यामुळे परिसरातील नागरिकच काय त्याचे कुटुंबीयही त्याला वैतागलेले होते. अनेक वेळा पोलिसांनी त्याला समजावून सांगितले होते. अल्पवयीन असल्याचा फायदा त्याला प्रत्येक गुन्ह्यात मिळत असे. दोन महिन्यांपूर्वी तो डोंगरी येथील बालसुधारगृहातून पळून गेला होता. त्याला पुन्हा ताब्यात घेतले होते. मागील महिन्यातच तो बालसुधारगृहातून सुटला होता. शिनगारे कुटुंबीय राहत असलेल्या घरापासून काही अंतरावर तुषार कोयता घेऊन नशाबाजी करून बसलेला असायचा. त्याच्या या टवाळखोरीमुळे शिनगारे कुटुंबीय वैतागलेले होते. घटनेच्या आदल्या दिवशी तुषारला सनी शिनगारे याने समज दिलेली होती. तरीही बुधवारी तो पुन्हा त्या मंदिराच्या मागील मोकळ्या जागेत येऊन बसलेला होता. सनी शिनगारे व त्याच्या भावांनी त्याला पुन्हा समजून सांगितले, मात्र याउलट तुषारने शिनगारे यांच्यावर अरेरावी केल्यामुळे तिन्ही भावांनी मिळून त्याचा डोक्यावर व चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केला.
अल्पवयीन आरोपीच्या श्रद्धांजलीचे बॅनर
सराईत गुन्हेगार तुषार भापकर याचा खून झाल्यानंतर त्यास श्रद्धांजली वाहणारे बॅनर लावले होते. संबंधित बॅनरचे फोटो शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले. या बॅनरवर ‘तू कल चला जाएगा... तो मै क्या करूंगा... आय अॅम बॅक आणि शोकाकुल : सरकार ३०२’ असा मजकूर होता. या बॅनरबाजीबाबत पोलिसांना माहिती मिळताच ते काढून घेतले होते.