अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
By admin | Published: February 20, 2015 12:19 AM2015-02-20T00:19:56+5:302015-02-20T00:19:56+5:30
शाळेमधून घरी जात असलेल्या बारा वर्षांच्या मुलीचे अपहरण करून, तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची खळबळजनक घटना बुधवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास सिंहगड रस्त्यावर घडली.
पुणे : शाळेमधून घरी जात असलेल्या बारा वर्षांच्या मुलीचे अपहरण करून, तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची खळबळजनक घटना बुधवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास सिंहगड रस्त्यावर घडली. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी दोघा जणांना अटक केली आहे. लोणावळ्यातील कुमार रिसॉर्टमध्ये झालेल्या पाच वर्षांच्या मुलीची बलात्कार आणि खुनाची घटना ताजी असतानाच पुण्यामध्ये ही घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.
सोमनाथ सर्जेराव पासलकर
(वय २३) व संजय अंकुश हळंबे (वय २७, रा. रायकरमळा, धायरी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पीडित मुलीने फिर्याद दिली आहे. सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी धायरी मधील रायकरमळ्यात राहण्यास आहे. तिचे वडील बिगारी काम करतात, तर आई लहान मुलांना सांभाळण्याचे काम करते. पीडित मुलगी सहावीमध्ये शिकते. तिची आजी जवळच राहण्यास आहे.
पीडित मुलगी शाळेमध्ये जाताना आरोपी तिला पाहात होते. बुधवारी संध्याकाळी ती शाळेमधून घरी जात असताना, आरोपींनी रस्त्यावर कोण नसल्याचे पाहून तिचे तोंड दाबून मोटारसायकलवर नांदेड फाट्याजवळ कॅनॉलकडेला नेले. तिथे या दोघांनीही तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या दोघांनी तिला पुन्हा घरा जवळ रस्त्यावर आणून सोडले. घरी गेल्यानंतर ही मुलगी ओक्साबोक्सी रडू लागली. मोठ्या बहिणीकडे तिने अत्याचाराची माहिती दिली. मोठ्या बहिणीने तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती कळविली. त्यानुसार सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुलीच्या घरी धाव घेतली.
परिमंडल दोनचे उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे, स्वारगेट विभागाचे सहायक आयुक्त मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहायक निरीक्षक जे. सी. गडकरी, उपनिरीक्षक कल्याणी पाडोळे, कैलास मोहोळ, किरण देशमुख, राम पवार, पांडुरंग वांजळे, काशिनाथ उभे, दयानंद तेलंगे-पाटील यांच्या पथकाने आरोपींना जेरबंद केले. आरोपी पासलकर व हळंबे हे दोघेही एकाच भागात राहणारे आहेत. पासलकर हा रिक्षाचालक आहे, तर हळंबे हा पेंटर असून, त्याला एक मुलगाही आहे.