अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून, पुण्यातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 09:16 PM2018-12-07T21:16:32+5:302018-12-07T21:39:28+5:30
सिंहगड परिसरातील धक्कादायक घटना, राहत्या घरात घडला प्रकार, आरोपी पसार.
पुणे : घरात एकटीच असल्याचा फायदा घेत सिंहगड परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा गळा आवळून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी मध्यरात्री उघडकीस आला. शवविच्छेदन अहवालातून तिच्यावर बलात्कार झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर सिंहगड रस्ता पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आाला आहे.
राहत्या घरात मुलीवर बलात्कारकरून खून झाल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिका-यांसह परिमंडळ तीनचे उपायुक्त मंगेश शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसले कुटुंबिय सिंहगड भागातील धायरेश्वर वस्तीत राहतात. संबंधित मुलगी ही परिसरातील एका महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. तर तिला एक 13 वर्षांचा भाऊ असून, तो आठवीत शिकतो. तिचे आई-वडिल मोल-मजूरीचे कामे करतात. नेहमीप्रमाणे आई-वडिल गुरुवारी सकाळी कामासाठी घराबाहेर पडले होते. तर भाऊ शाळेत गेला होता. त्यामुळे ती एकटीच घरी होती. तिचा भाऊ सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शाळेतून घरी आल्यानंतर त्याने तीला बेशुद्ध अवस्थेत बेडवर पडलेली पाहिली. भावाने तिला आवाज देऊन उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र अनेकदा आवाज देऊनही ती उठत नसल्याने त्याने आई-वडिलांना फोनकरून याबाबत माहिती दिली.
मुलाचा फोन आल्यामुळे आई-वडिलांनी तत्काळ घरी धाव घेतली. यानंतर त्यांनी त्वरीत तिला जवळच्य खाजगी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषीत केले. दरम्यान, तिचा हात, पाय आणि गळ्यावर जखमा झाल्या आहेत. शवविच्छेदन करण्यात आले असता तिच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले. बलात्कार करून तिचा गळा आवळून खून करण्यात आला आहे.
सीसीटीव्ही व मोबाइलमध्ये काहीच आढळले नाही :
या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांना त्वरीत धाव घेतली. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरात अससेल्या सीसीटीव्हीचे फुटेज जमा केले असून सध्या ते तपासण्यात येत आहे. आत्तापर्यंत हाती आलेल्या फुटेजमध्ये काहीही मिळून आलेले नाहे. तिचा मोबाइल देखील तपासण्यात आला आहे. मात्र, त्यातून देखील ठोस माहिती समोर आलेली नाही. येथील रहिवाशांकडे चौकशी करून आरोपीचा शोध घेतला जात आहेत. घटना घडलेल्या इमारतीमध्ये बहुंताश कुटुंब हे भाड्याने राहणारे आहेत. येथील अनेक व्यक्ती कामासाठी बाहेर जात असल्याने इमारतीमध्ये दिवसभर कमी वर्दळ असते.