पुणे शहर हादरले, अल्पवयीन मुलीवर सहा जणांकडून बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 10:25 AM2022-12-28T10:25:17+5:302022-12-28T10:27:04+5:30
पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी तक्रार दिली आहे.
किरण शिंदे
पुणे : सामूहिक बलात्काराच्या घटनेने पुणे शहर हादरले आहे. चाकूचा धाक दाखवून एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करत तिच्यासोबत सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर या मुलीचे लग्न अवस्थेतील फोटो काढून हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यासोबत पुन्हा बलात्कार करण्यात आला. चतु:शृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत जुलै २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत हा संपूर्ण प्रकार घडला.
याप्रकरणी ओम राजू तिंबोळे, जय राजू तिंबोळे, अनिल जाधव, सुनील जाधव, शुभम आणि किरण जावळे या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक केली आहे. पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी तक्रार दिली आहे. चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, पीडित मुलगी पंधरा वर्षे वयाची आहे. ती अल्पवयीन आहे हे माहीत असतानाही आरोपी अनिल जाधव याने चाकूचा धाक दाखवून तिला विशाल नगर येथील एका लॉजवर घेऊन जात तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. आरोपीने यावेळी तिचे लग्न अवस्थेतील फोटो काढले. नंतर हेच फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन इतर आरोपींनी तिच्यावर बाणेर आणि औंध परिसरात पुन्हा सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.