हनुमान टेकडीवर अल्पवयीन मुलीला लुटले;टेकडीवर लुटण्याची तिसरी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 19:10 IST2025-01-07T19:09:38+5:302025-01-07T19:10:00+5:30
या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हनुमान टेकडीवर अल्पवयीन मुलीला लुटले;टेकडीवर लुटण्याची तिसरी घटना
पुणे : हनुमान टेकडीवर मित्रासमवेत फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन १७ वर्षीय मुलीला चोरट्यांनी लुटले. मित्राला कोयत्याचा धाक दाखवून तिच्या गळ्यातील एक लाख रुपयांची सोनसाखळी लंपास करून चोरटे पसार झाले. हनुमान टेकडी परिसरात घडलेली ही लुटमारीची तिसरी घटना आहे.
याबाबत अल्पवयीन मुलीने डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. ४) दुपारी दोनच्या सुमारास मुलगी आणि तिचा मित्र सेनापती बापट रस्त्यावरील हनुमान टेकडी परिसरात फिरायला गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी मुलगी आणि तिच्याबरोबर असलेल्या मित्राला धमकावून शिवीगाळ केली. त्यांना काेयत्याचा धाक दाखविला.
अल्पवयीन मुलीला मारहाण करुन चोरट्यांनी तिच्या गळ्यातील एक लाख रुपयांची सोनसाखळी चोरून नेली. घाबरलेली मुलगी आणि तिचा मित्र तेथून घरी गेले. मुलगी घाबरली होती. त्यानंतर तिने सोमवारी (दि. ६) डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीशा निंबाळकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस उपनिरीक्षक सावंत तपास करत आहेत.