गौणखनिज उत्खनन व अवैध वाहतुकीचा सुळसुळाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:08 AM2021-07-16T04:08:52+5:302021-07-16T04:08:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शेलपिंपळगाव : खेडच्या पूर्व तसेच शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात अवैध वाळू व मुरुम वाहतुकीचा सुळसुळाट झाला ...

Minor mineral extraction and illegal transportation | गौणखनिज उत्खनन व अवैध वाहतुकीचा सुळसुळाट

गौणखनिज उत्खनन व अवैध वाहतुकीचा सुळसुळाट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

शेलपिंपळगाव : खेडच्या पूर्व तसेच शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात अवैध वाळू व मुरुम वाहतुकीचा सुळसुळाट झाला आहे. अशा, वाहतुकीमुळे स्थानिक नागरिकांना समस्येला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे अवैध मालाची वाहतूक करणारी ही वाहने आडमार्गे भरधाव वेगाने ये-जा करत आहेत. बुधवारी (दि.१४) मोहितेवाडी-केंदूर रस्त्यावर चिंचोशी (ता. खेड) गावच्या हद्दीत एका उच्चशिक्षित तरुणाचा अवैध वाहतूक करणाऱ्या डंपरने बळी घेतला. अशा घटनेनंतर अवैध वाहतुकीला पाठबळ देणाऱ्या महसूल विभागाच्या काम प्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सध्या वाळूउपशावर पूर्ण बंदी आहे. तर मुरुम, दगड, माती अशी गौणखनिज उत्खनन व वाहतूक करण्याला देखील बंदी आहे. मात्र, बंदी असतानाही चाकण-शिक्रापूर राज्यमार्ग, मोहितेवाडी-केंदूर, चौफुला-केंदूर, धामारी-केंदूर, पाबळ-चौफुला, शेलगाव-आळंदी, कोयाळी-मरकळ, तुळापूर- आळंदी, चिंचोशी-दावडी, निमगाव-राजगुरूनगर, कनेरसर- राजगुरूनगर, पाबळ-शिरूर आदी रस्त्यांवरून सर्रास वाळू, मुरुम, दगड व मातीची वाहतूक केली जात आहे. विशेषतः मध्यरात्री बारापासून ते पहाटेच्या वेळात वाळूची तर मुरुम, माती व दगडाची वाहतूक दिवसाढवळ्याही केली जात आहे.

व्यावसायिकांकडून अवैध मालाची वाहतूक करण्यासाठी डंपर, ट्रकचा वापर केला जात आहे. चार ते पाच टन क्षमतेची ही अवजड वाहने रस्त्यावरून प्रवास करताना सर्व वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून भरधाव वेगाने ये-जा करत आहेत. रस्ते अरुंद असल्याने अशा वाहतुकीचा रस्त्यावरील इतर वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. अनेक वेळा या वाहतुकीमुळे इतर वाहनांला अपघात घडत आहेत. तीन वर्षांपूर्वी मोहितेवाडी हद्दीत वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकने चिमुरडीचा बळी घेतला होता. तर बुधवारी चिंचोशी परिसरात स्थानिक अंकित नंदकुमार सांगडे (वय २५) या तरुणाला डंपरने चाकाखाली चिरडले. अशा घटना पाहता अवैध वाहतुकीवर नियंत्रण असणे आवश्यक आहे. मात्र, संबंधित विभाग मूग गिळून गप्प का? आतातरी महसूल विभाग अशा वाहतुकीवर कारवाई करणार का, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

चौकट : कुंपणच खातंय शेत....

शासनाने नदीतील वाळूउपशावर बंदी घातली आहे. वाळूउपशाचे लिलावही केले नाहीत. तर मुरुम, दगड व माती अशांचा उपसा व वाहतूक करण्यासाठी कायदेशीर परवानगी घेऊन संबंधित मालाची रॉयल्टी शासनाला भरणे बंधनकारक केले आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी संबंधित गावातील महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. सध्या मात्र अवैध वाळूउपसा, माती व मुरुम वाहतूक राजरोसपणे जोरात सुरू असून महसूल विभागाचे अधिकारीच चिरीमिरी घेऊन त्यास चालना देत असल्याची सत्यस्थिती आहे.

चौकट : नव्याने डांबरीकरण किंवा दुरुस्ती केलेल्या रस्त्यांवरून अवैध वाळू व मुरुम वाहणाऱ्या अवजड वाहनांची ये-जा होत आहे. क्षमतेपेक्षा जास्त भार पडत असल्याने रस्ते उखडत आहेत. परिणामी अशा वाहतुकीवर मज्जाव घालण्याची मागणी केंदूरकर ग्रामस्थांनी केली आहे.

काेट

शिरूर तालुका हद्दीतून केंदूरमार्गे चिंचोशीतून चाकणकडे अवैध वाळू वाहतूक करणारी असंख्य वाहने वेगाने ये-जा करत आहेत. आमच्या गावातील उच्चशिक्षित तरुणाचा अशा बेजबाबदार वाहतुकीने बळी घेतला आहे. चिंचोशी गावातून अशा अवैध वाहतुकीवर बंदी घालण्यासाठी ग्रामपंचायत तर्फे सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिसांना लेखी पत्र दिले आहे.

- उज्ज्वला गोकुळे, सरपंच, चिंचोशी

कोट

बेकायदेशीर वाळूउपसा करून मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास अनेक मोठं - मोठी वाहने एकापाठोपाठ चोरटी वाहतूक करत आहेत. या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त माल भरलेला असतो. त्यामुळे अपघात तसेच अनेक ठिकाणी रस्ते उखडले जात आहेत. यापूर्वी अशा गाड्या अडवून त्यांना मज्जाव केला होता. मात्र परिस्थिती 'जैसे थे' आहे. स्थानिक महसूल विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.

- गणेश डेरे, युवा कार्यकर्ते, केंदूर.

कोट

‘‘अवैध वाळू, मुरुम, माती उत्खनन व वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी स्थानिक सर्कल, तलाठी आहेत. तसेच विशेष पथकेही तैनात केलेली आहेत. मात्र तरीही अवैध धंदे सुरू असतील तर संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना कारवाईच्या स्ट्रीक्ट सूचना देण्यात येईल.

- वैशाली वाघमारे, तहसीलदार, खेड.

फोटो ओळ : चिंचोशी (ता. खेड) येथे पंचवीस वर्षीय तरुणाचा बळी घेणारा अजवड डंपर.(छाया : भानुदास पऱ्हाड)

Web Title: Minor mineral extraction and illegal transportation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.