केंद्रीय प्रवेशातून अल्पसंख्यांक महाविद्यालये वगळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 10:09 PM2018-07-16T22:09:25+5:302018-07-16T22:15:57+5:30
एका याचिकेवर निर्णय देताना अल्पसंख्यांक महाविद्यालयांचे प्रवेश केंद्रीय पध्दतीने न होता ते त्या त्या महाविद्यालयस्तरांवर करण्याचा अधिकार न्यायालयाने अल्पसंख्यांक महाविद्यालयांना दिला आहे.
पुणे : अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून अल्पसंख्यांक महाविद्यालयांचे प्रवेश वगळण्याचे निर्देश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. अल्पसंख्यांक महाविद्यालयांच्या अकरावीचे प्रवेश यापुढे महाविद्यालयस्तरावरच पार पाडले जाणार आहे. पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये ४७ अल्पसंख्यांक महाविद्यालये आहेत, त्यामुळे या महाविद्यालयांच्या रिक्त राहिलेल्या जागा आता त्यांच्या स्तरावरच भरल्या जाणार आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांच्या अकरावीचे प्रवेश केंद्रीय प्रवेश समितीव्दारे आॅनलाइन पध्दतीने राबविण्यात येत आहे. सध्या अकरावीच्या प्रवेशाची दुसरी फेरी सुरू आहे. नागपूर खंडपीठात दाखल झालेल्या एका याचिकेवर निर्णय देताना अल्पसंख्यांक महाविद्यालयांचे प्रवेश केंद्रीय पध्दतीने न होता ते त्या त्या महाविद्यालयस्तरांवर करण्याचा अधिकार न्यायालयाने अल्पसंख्यांक महाविद्यालयांना दिला आहे.
अल्पसंख्यांक कनिष्ठ महाविद्यालयांच्या रिक्त असलेल्या जागा संबंधित व्यवस्थापनाकडे परत करण्यात येत आहेत. त्यानुसार या महाविद्यालयांनी ५० टक्के प्रवेश अल्पसंख्यांक कोटा, २० टक्के इन हाऊस कोटा व ५ टक्के व्यवस्थापन कोटा यापध्दतीने प्रवेश पार पाडायचे आहेत. अल्पसंख्यांक महाविद्यालयांनी याच पध्दतीने प्रवेश देणे आवश्यक आहे. तसेच केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या नियमित फेऱ्या संपल्यानंतर प्रवेशासाठी विद्यार्थी शिल्लक राहिल्यास अल्पसंख्यांक महाविद्यालयाच्या रिक्त जागांवर कोटा पध्दतीने प्रवेश देता येणार आहे.
अकरावी प्रवेशासाठी ७५ हजार ९३९ विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे, त्यापैकी ४१ हजार ९६१ विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये त्यांनी दिलेल्या १० पसंती क्रमानुसार महाविद्यालय मिळाले होते. त्यापैकी पहिल्या फेरीअखेर २१ हजार १२२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे तर २० हजार ५१० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही. ३३ हजार ९७८ विद्यार्थ्यांना त्यांनी भरलेल्या पसंतीक्रमानुसार महाविद्यालय मिळाले नाही. त्यामुळे दुसºया फेरीत ५४ हजार ४८८ विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
..................
दुसºया फेरीची गुणवत्ता यादी १९ जुलै
नागपूर खंडपीठाच्या या निर्णयामुळे गुणवत्ता यादीच्या तारखेमध्ये बदल करण्यात आला आहे. दुसरी फेरीची गुणवत्ता यादी १६ जुलै रोजी प्रसिध्द केली जाणार होती. त्यामध्ये बदल करण्यात आला असून गुरूवार, दि. १९ जुलै रोजी ही यादी प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.महाविद्यालयांचे पसंतीक्रमही बदलावे लागणार
अल्पसंख्यांक कनिष्ठ महाविद्यालयांचे सर्व जागा त्या महाविद्यालयांना परत केल्या जाणार आहेत. त्यामुळे केंद्रीय प्रवेश फेरीत विद्यार्थ्यांना आता त्या महाविद्यालयांचे पसंती क्रम टाकता येणार नाही. त्याच महाविद्यालयामध्ये प्रवेश हवा असल्यास त्यांच्या स्तरावर स्वतंत्र प्रवेश अर्ज भरावा लागणार आहे.अकरावीच्या ५ हजारांपेक्षा जास्त जागा कमी होणार
पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये ४७ अल्पसंख्यांक महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशाच्या ५ हजार पेक्षा जास्त जागा केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून कमी होणार आहेत.