#mipunekar : पुणेरी मिसळचा झटका न्याराचं ! जाणून घ्या प्रसिद्ध मिसळस्पॉट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 12:41 PM2018-03-14T12:41:05+5:302018-03-14T12:50:43+5:30

तेजतर्रार अशी खरी मिसळची ओळख असली तरी पुण्यात मात्र त्यात काहीशी आंबट-गोड चवही मिसळलेली आहे. मिसळमध्ये उकडलेल्या बटाट्याचे तुकडे आणि खजुराची चटणी हे वाचायला वेगळं वाटत असलं तरी खायला मात्र जाम भारी लागतं. त्यावर बारीक चिरलेला लिंबाच्या थेंबांची पखरण असेल तर आहाहा ! त्यामुळे पुण्यात असल्यावर इथली मिसळ खाणं मस्ट आहे. 

#mipunekar: Top 5 Misal Pav Spots in Pune | #mipunekar : पुणेरी मिसळचा झटका न्याराचं ! जाणून घ्या प्रसिद्ध मिसळस्पॉट 

#mipunekar : पुणेरी मिसळचा झटका न्याराचं ! जाणून घ्या प्रसिद्ध मिसळस्पॉट 

googlenewsNext

पुणे :

पुण्यात आलात आणि मिसळ खाल्ली नाही असं कोणी केलं असेल तर त्या व्यक्तीने फार मोठी गोष्ट मिस केली आहे. पुण्यात प्रत्येक कोपऱ्यावर मिसळ मिळते आणि तीही वेगवेगळ्या चवीची. पण तरीही चवीने खाणाऱ्या खवैय्यांसाठी काही ठिकाणं मात्र अधिक जवळची आहेत. असेच जाळ आणि धूर संगटच काढणारे काही मिसळ स्पॉट तुमच्यासाठी. 

बेडेकर मिसळ :

नारायण पेठीतील बेडेकर मिसळ शहरातल्या जुन्या मिसळीच्यापैकी एक आहे. पुणेकरांच्या स्वभावाला साजेशी अर्थात रंगाने लाल पण चवीने थोडीशी गोडसर असलेली ही मिसळ आपली जुनी चव आजही टिकवून आहे.ही मिसळ खाण्यासाठी उपनगर परिसरातून अनेक जण खास सवड काढून येतात. इथे मिसळीसोबत पावाची अपेक्षा असेल तर मात्र निराशा पदरी पडणारा असून याठिकाणी ब्रेड स्लाईस देण्यात येते. 

श्रीकृष्ण भुवन :

तुळशीबागेत असलेल्या श्रीकृष्ण भुवनच्या मिसळीवर अनेकांचा जीव अडकला आहे. गरमागरम मिसळ आणि त्यासोबत ब्रेड स्लाइस अशी सर्व्ह केली जाणारी ही मिसळ सुवासानेच आपले मन चाळावते. टोमॅटो आणि नारळाच्या वाटणातून अफलातून दाटसर रस्सा केला जातो. या मिसळचं वैशिष्ट्य म्हणजे चवदार असूनही तिखटजाळ मात्र नसते. 

साईछाया मिसळ :

नळस्टॉप चौकात खेड शिवपूरची साई छाया मिसळ मिळते. चवीला अफलातून काळ्या मसाल्याच्या रश्श्यात ही मिसळ दिली जात असल्याने गावाकडे खाल्ल्याचा फील येतो. त्यांच्याकडे मिसळीसोबत सर्व्ह केला जाणारा मठ्ठाही वरच्या क्लासचा असून तिखट मिसळीवर रामबाण उपाय आहे. यांच्याकडे मिसळीच्या सोबत पापडही दिला जातो. 

 

काटाकिर्र मिसळ 

कर्वे रस्त्यापासून थोडीशी आतल्या बाजूला मिळणारी ही मिसळ नादखुळ्या कोल्हापुरी चवीची आठवण देते. तिखटानुसार तीन प्रकारांमध्ये मिळणारी ही मिसळ खाणाऱ्याचे मनचं नाही जीभ पण तृप्त करते. यांचाही मसाला ते स्वतः करत असल्याने बाहेर त्या चवीची किंवा रंगाची मिसळ मिळणे अशक्य आहे.  

मस्ती मिसळ :

कोथरूड डेपोजवळ मिळणाऱ्या मस्ती मिसळही पुणेकरांच्या पसंतीस उतरली आहे. जागा लहान असली तरी अत्यंत स्वच्छतेत इथे मिसळ सर्व्ह केली जाते. मिसळीसोबत दह्याची वाटी ही इथली अजून एक खासियत. अनलिमिटेड रस्सा आणि सोबत कांदा आणि लिंबूची चव या मिसळीला 'दर्जा ' चव आणते. 

Web Title: #mipunekar: Top 5 Misal Pav Spots in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.