मिरज जंक्शनला सुविधांची वानवा
By admin | Published: July 19, 2015 11:12 PM2015-07-19T23:12:38+5:302015-07-19T23:42:55+5:30
प्रवाशांचे हाल : जंक्शनला खासगीकरणातून विकासाची प्रतीक्षा
सदानंद औंधे - मिरज -कर्नाटक सीमेवरील महत्त्वाचे जंक्शन असलेल्या मिरज रेल्वे स्थानकात प्रवासी सुविधांची वानवा आहे. निधीअभावी रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. मात्र आता खासगीकरणातून विकासासाठी मिरज स्थानकाचा समावेश झाल्याने रेल्वे प्रवाशांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
कोल्हापूर व मिरज मॉडेल रेल्वेस्थानक बनविण्याची, मिरजेत रेल्वे हॉस्पिटल व मॉल उभारण्याची अनेक वर्षांपासून केवळ घोषणाच करण्यात येत आहे. १९२७ नंतर मिरजेपासून एकाही नवीन रेल्वेमार्गाची उभारणी झालेली नाही. मात्र मिरजेतून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढली आहे. लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेससाठी मिरजेतून आरक्षण कोटा अत्यंत कमी असल्याने प्रवाशांची गैरसोय होत होते. आरक्षण स्थिती दर्शविणारे पोएट यंत्र बंद आहे. रेल्वे स्थानकातील तिकीट खिडक्याही अपुऱ्या आहेत. मिरज स्थानकाचे नूतनीकरण व प्रवासी सुविधांसाठी खासगीकरणातून रेल्वेकडे निधी उपलब्ध झाल्यामुळे रखडलेली कामे व स्थानकाचा विकास होण्याची शक्यता आहे.
मिरज स्थानकातील चौकशी खिडकी बंद असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांची अडचण होते. प्लॅटफॉर्म १ व २ सुस्थितीत आहेत. उर्वरित ४ प्लॅटफॉर्मचे नूतनीकरण आवश्यक आहे. प्लॅटफॉर्मवरील छताला गळती आहे. प्लॅटफॉर्मवर कोच इंडिकेटर नाही. प्लॅटफॉर्मवर शुध्द पाण्याची व्यवस्था नाही. पिण्याच्या पाण्यासाठी असलेले नळ नादुरुस्त व गळके आहेत.
प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानकात तिकीट व्हेडिंग यंत्रे आणण्यात आली आहेत. मात्र ही यंत्रे अद्याप सुरु झालेली नाहीत. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही बसण्यिात आला आहे. मात्र रेल्वे स्थानकाला बंदिस्त कुंपण नसल्याने चारही दिशेने प्रवाशांची ये-जा सुरु असते. स्थानक व परिसरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात होत असून, साहित्याच्या चोऱ्या व पाकीटमारीमुळे प्रवासी हैराण आहेत. स्थानकात नवीन पदचारी पूल बांधण्यात आला आहे. मात्र मिरज प्रमुख वैद्यकीय केंद्र असताना वृध्द, अपंग व रुग्णांना पुलावर नेण्यासाठी रॅम्पची व्यवस्था नाही. स्थानकाच्या प्रवेशद्वारात प्रवाशांच्या साहित्याची तपासणी करण्यासाठी स्कॅनर यंत्रणा बसविण्यात आली आहे. पण हे यंत्र वारंवार बंद असते. स्थानकात निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या अवैध विक्रेत्यांचा सुळसुळाट आहे.
भिकारी, व्यसनी, तृतीयपंथी यांचा प्रवाशांना उपद्रव होत आहे. रेल्वे स्थानकाच्या आवारात खोक्यांची अतिक्रमणे आहेत. रेल्वे स्थानकातील सफाईसाठी वार्षिक ९० लाख रुपये खासगी ठेकेदारास देण्यात येतात. मात्र स्वच्छतागृहे, शौचालय, प्रतीक्षागृहांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता व गटारी तुंबल्याने दुर्गंधी आहे. खासगीकरणातून पुनर्विकास करताना मिरज स्थानकातील या समस्या सोडविण्याची रेल्वे प्रवाशांना अपेक्षा आहे. मिरज-कवठेमहांकाळ-जत-विजापूर व कऱ्हाड-कडेगाव-लेंगरे-खरसुंडी-आटपाडी-दिघंची-महूद-पंढरपूर या दुष्काळी भागातून नवीन रेल्वे मार्गाचा प्रस्ताव आहे. हा नवीन रेल्वमार्ग पूर्ण झाल्यानंतर दुष्काळी भागाच्या विकासाला हातभार लागणार आहे.
खासगीकरणातून स्थानक विकसित करताना नवीन रेल्वेगाड्यांसह नवीन रेल्वेमार्ग उभारणी, दुहेरीकरण, विद्युतीकरणासाठी रेल्वेने निधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
पुणे-मिरज-कोल्हापूर या रेल्वे मार्गावर प्रवासी व मालवाहतूक मोठी आहे. या २२७ कि. मी. रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी सर्वेक्षण सुरु आहे. दुहेरीकरण व विद्युतीकरणानंतर मिरजेतून पुणे, मुंबई प्रवास जलद व सोयीचा होणार आहे. मिरज जंक्शन स्थानक असतानाही कृषी मालाच्या वाहतुकीसाठी सुविधा अपुऱ्या आहेत. दिल्लीला माल पाठविण्यासाठी रेल्वेगाड्यांत जागा मिळत नसल्याने कृषिमाल स्थानकातच पडून राहतो. मिरज-पंढरपूर रेल्वे मार्गाचे रूंदीकरण तब्बल तीन दशकानंतर पूर्ण झाले. मात्र या रेल्वे मार्गावर गाड्यांची संख्या अत्यंत कमी आहे.
सोलापूर, पुण्यातील अधिकाऱ्यांचा वाद
मिरज स्थानकासमोरील जुन्या नॅरोगेज स्थानकाच्या मोकळ्या सात एकर जागेवर बुकिंग कार्यालय व मॉल उभारण्याची रेल्वेची योजना आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाच्या मालकीची ही जागा पुणे विभागाने विकसित करण्यासाठी मागितली आहे. मात्र सोलापूर विभागाने ही जागा देण्यास नकार दिल्याने खासगीकरणातून स्थानकाच्या विकासाची योजना राबविण्यापूर्वीच सोलापूर व पुणे रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांत वाद निर्माण झाला आहे.