पुन्हा रिझवणार ‘मिरासदारी’, लघुपटातून उलगडणार दमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:36 AM2018-04-14T00:36:07+5:302018-04-14T00:36:07+5:30

गणा मास्तर, हरीनाना, नाना चेंगट, रामा खरात, बाबू पैलवान अशी इरसाल पात्रे द. मा. मिरासदार यांनी आपल्या विनोदी बाजाच्या कथांमधून सशक्तपणे उभी करत रसिकांना रिझवले.

'Mirasadari' will be revived, asthma will be unveiled by a short film | पुन्हा रिझवणार ‘मिरासदारी’, लघुपटातून उलगडणार दमा

पुन्हा रिझवणार ‘मिरासदारी’, लघुपटातून उलगडणार दमा

Next

- प्रज्ञा केळकर-सिंग 
पुणे : गणा मास्तर, हरीनाना, नाना चेंगट, रामा खरात, बाबू पैलवान अशी इरसाल पात्रे द. मा. मिरासदार यांनी आपल्या विनोदी बाजाच्या कथांमधून सशक्तपणे उभी करत रसिकांना रिझवले. सहज-सोपी भाषा, छोटे छोटे प्रसंग, ग्रामीण शैलीतील ठसकेबाज संवाद, त्यातून फुलत गेलेल्याकथांचा आणि पात्रांचा निर्माताच आता लघुपटाच्या माध्यमातून पडद्यावर अवतरणार आहे. आज (१४ एप्रिल) वयाची ९१ वर्षे पूर्ण करत असलेल्या दमांसाठी शासनातर्फे विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. त्याच कार्यक्रमात रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या दमांचा जीवनपट ‘मिरासदारी’ या लघुपटातून उलगडेल.
मिरासदारांच्या व्यंकूची शिकवणी, माझ्या बापाची पेंड, शिवाजीचे हस्ताक्षर, भुताचा जन्म, माझी पहिली चोरी, हरवल्याचा शोध इत्यादी कथा उत्कृष्ट लिखाण आणि सादरीकरण यामुळे रसिकांच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या. गप्पागोष्टी, गुदगुल्या, मिरासदारी, गप्पांगण, ताजवा असे २४ कथासंग्रह, १८ विनोदी चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या नावावर आहेत. ‘एक डाव भुताचा’ या चित्रपटात कथा-पटकथा लेखनासह हेडमास्तरची भूमिकाही त्यांनी केली होती. दमांची ही मुशाफिरी लघुपटाच्या निमित्ताने पडद्यावर आणण्यासाठी त्यांचा नातू रोहन मंकणी याने पुढाकार घेतला आहे.
१० मिनिटांच्या लघुपटांमध्ये द. मा. मिरासदार यांचा अकलूजपासून पुण्यापर्यंतचा प्रवास, त्यांचे कथाकथन, आठवणी आदींचा समावेश आहे. त्यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त प्रसाद मिरासदार यांनी लघुपटाच्या पटकथेचे लेखन केले होते. पुढील ११ वर्षांचा प्रवास, त्यांच्याकडून ऐकलेल्या आठवणी यांचा नव्या पटकथेमध्ये समावेश करण्यात आला आहे, त्यातून आताचे ताजेतवाने दमा रसिकांना अनुभवता येतील, अशी माहिती दमांची कन्या सुनेत्रा मंकणी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
द. मा. मिरासदार यांच्या आठवणी, लेखन, कथाकथन, साहित्यिकांच्या, कलाकारांच्या भावना यांचे एकत्रीकरण करून दस्तावेजीकरण करण्यात येत आहे. मंकणी यांच्या स्टुडिओमध्ये दृकश्राव्य एकत्रीकरणाचे काम सुरू आहे, असेही त्या म्हणाल्या.
द. मा. मिरासदार यांच्या नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त द. मा. मिरासदार प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. यानिमित्ताने मिरासदारी महोत्सवाचा प्रारंभ करण्यात
आला. कथाकथन स्पर्धा,
शाळांना दमांच्या पुस्तकांची भेट, लेखन स्पर्धा, कथांवर आधारित नाटके, नाट्यवाचन, एकांकिका स्पर्धा आदी विविध उपक्रम राबवण्यात आले.
अशा उपक्रमांच्या माध्यमातून या वर्षीपासून कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र अशा चार भागांमध्ये मिरासदारी महोत्सव आयोजित करून दरवर्षी मुंबईत समारोप करायचा, अशी आखणी करण्यात आली आहे. शासनाचे अनुदान मिळाल्यास महोत्सव व्यापक करण्याचा मानस आहे.

Web Title: 'Mirasadari' will be revived, asthma will be unveiled by a short film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.