मिर्झा गालिब यांच्या प्रतिभेचे चीज झाले नाही : डॉ. सईद तकी आबिदी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 08:50 PM2019-12-26T20:50:47+5:302019-12-26T20:51:12+5:30
मिर्झा गालिब यांनी दीड हजार उर्दू शेर लिहिले. फारसी शेर १३ हजारांहून अधिक लिहिले...
पुणे : मिर्झा गालिब यांनी दीड हजार उर्दू शेर लिहिले. फारसी शेर १३ हजारांहून अधिक लिहिले आहेत. देवदूत, फरिश्ते सुध्दा मानवी जीवनातील मौज, हळूवार भावना समजू शकणार नाहीत; पण गालिब केवळ शायरीतून हळूवारपणे ही मौज, भावना पुढे आणत होते. परंतु, गालिब यांच्या प्रतिभेचे चीज झाले नसल्याची खंत आंतरराष्ट्रीय अभ्यासक डॉ. सईद तकी आबिदी यांनी व्यक्त केली.
मिर्झा गालिब यांची २२२व्या जयंतीनिमित्त हाजी गुलाम महमद आझम एज्युकेशन ट्रस्ट,रसिक मित्र मंडळ आणि इना फाउंडेशन या संस्थांच्या वतीने आंतरराष्ट्रीय अभ्यासक डॉ. सईद तकी अबिदी यांचे ‘गालिब का अंदाज-ए-बयान’ या विषयावर व्याख्यान झाले. त्या वेळी ते बोलत होते. नॅशनल कौन्सिल फॉर प्रमोशन ऑफ उर्दू लेन्ग्वेजचे सदस्य डॉ. पी. ए. इनामदार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी आबेदा इनामदार, इना फाउंडेशनचे अध्यक्ष झुबेर शेख, मुनव्वर पिरभॉय, मुमताज पिरभॉय उपस्थित होते.
डॉ. आबिदी म्हणाले, मिर्झा गालिब सारखा शायर झाला नाही. खूप कमी मानधनात नोकरी करताना त्यांची घालमेल होत असे. पण, त्यांच्या विपरीत परिस्थितीत मदत करायला कोणी तयार नव्हते. गालिब प्रतिभावान शायर होते, पण, त्यांच्या प्रतिभेचे चीज झाले नाही. तो काळ इतक्या महान प्रतिभेला समजून घेण्यास सज्ज नव्हता. अजूनही त्यांचे शेकडो शेरमधील भावना आपण समजून घेण्यास अपुरे पडतो. काळाच्या पुढचे शब्द लिहिताना ते समकालीन मंडळींना दुखावत नव्हते.दैव दुर्लभ अशी शब्दांची दुनिया त्यांनी उभी केली. त्यांच्या शायरीवर अजून संशोधन व्हायला हवे.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ पी ए इनामदार म्हणाले,' यशस्वी हृदयरोग तज्ज्ञ असताना देखील डॉ. अबिदी यांनी ऊर्दू भाषा,कवी यांचा जो अभ्यास केला, त्याची तोड नाही. आमच्या कॅम्पस मधील उर्दू विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळण्यासाठी त्यांच्या अभ्यासाची मदत होईल. डॉ.आबिदी यांच्या लेखनावर पी.एच.डी. करण्यास आम्ही प्रोत्साहन देऊ. '
यावेळी उर्दू शायर फैज अहमद फैज यांच्यावर डॉ.आबिदी लिखित पुस्तकाचे प्रकाशन झाले. प्रा, उजमा तस्निम यांनी सूत्र संचालन केले.