स्वस्त धान्य दुकानातील ९ हजार किलो तांदळाचा अपहार, गुन्ह्यात वापरली एसटी महामंडळाची बस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 06:41 PM2024-01-09T18:41:42+5:302024-01-09T18:42:16+5:30

आरोपींकडून १ लाख ६९ हजार २०० रुपये किमतीच्या तांदळासह गुन्ह्यात वापरलेली एसटी महामंडळाची ५ लाख रुपये किमतीची महाकार्गो बस असा ६ लाख ६९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे....

Misappropriation of 9 thousand 400 kg of rice from cheap grain shop, bus of ST corporation used in the crime | स्वस्त धान्य दुकानातील ९ हजार किलो तांदळाचा अपहार, गुन्ह्यात वापरली एसटी महामंडळाची बस

स्वस्त धान्य दुकानातील ९ हजार किलो तांदळाचा अपहार, गुन्ह्यात वापरली एसटी महामंडळाची बस

इंदापूर (पुणे) : स्वस्त धान्य दुकानातील १ लाख ६९ हजार २०० रुपये किमतीच्या ९ हजार ४०० किलो तांदळाचा अपहार केल्याच्या आरोपावरुन तिघा जणांविरुद्ध इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दि. ८ जानेवारी रोजी पहाटे हा प्रकार घडला. आरोपींकडून १ लाख ६९ हजार २०० रुपये किमतीच्या तांदळासह गुन्ह्यात वापरलेली एसटी महामंडळाची ५ लाख रुपये किमतीची महाकार्गो बस असा ६ लाख ६९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

शैलेश अशोक ढोले (रा. रामदास पथ मेनरोड इंदापूर), गणेश होळकर (रा. सावतामाळी नगर इंदापूर), शिवाजी पवार (रा. वडापुरी ता. इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. तालुक्याचे पुरवठा निरीक्षक संतोष निशिकांत अनगरे (रा. जोशी गल्ली, इंदापूर) यांनी त्यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे. यातील आरोपी ढोले हा बाजार समितीमधील धान्य आडतदार आहे. होळकर हा इंदापूर शहर नागरी पतसंस्थेच्या स्वस्त धान्य दुकानातील विक्रेता आहे. तर शिवाजी पवार हा वडापुरी येथील जय बजरंग महिला बचत गटाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या स्वस्त धान्य दुकानातील विक्रेता आहे.

अधिक माहितीनुसार, दि. ७ जानेवारी रोजी इंदापूर अकलूज राज्य रस्त्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वार जवळ इंदापूर पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक शंकर राऊत,फौजदार महेश गरड,पोलिस शिपाई दिनेश चोरमले यांनी त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे एसटी महामंडळाची मालवाहतूक करणारी महाकार्गो बस (क्र. एमएच ०७ सी ७४४०) ही पकडली. त्या बसमध्ये तांदूळ आहे. तेथे जाऊन खात्री करुन कारवाई करा असा आदेश तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी फिर्यादी अनगरे यांना दिला.

त्यानुसार अनगरे तेथे गेले. चौकशी करत असताना आरोपी शैलेश ढोले याने तांदूळ आपल्या मालकीचा आहे. तो आपल्या सरस्वतीनगर येथील गोदाम व कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मे. ढोले ट्रेडिंग मधून भरला असल्याचे सांगितले. तांदळाची बिले,खरेदी पावत्या मागितल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संशय निर्माण झाला. त्यामुळे अनगरे यांनी बसचालक अशोक रामचंद्र भगत (रा. उघडेवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यास पूर्वकल्पना देऊन बसची झडती घेतली.

या झडतीत प्रत्येकी अंदाजे पन्नास किलो वजनाच्या तांदळाच्या १८८ गोण्या बसमध्ये असल्याचे आढळून आले. ढोले याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने काही पुरवठादारांची नावे सांगितली. त्यानुसार इंदापूर शहर नागरी पतसंस्थेच्या वतीने चालवण्यात येत असलेल्या स्वस्त धान्य दुकानातील ३६८ किलो तांदळाचा तर जय बजरंग महिला बचत गटामार्फत चालवण्यात येत असलेल्या स्वस्त धान्य दुकानातील ६९१ किलो तांदळाचा अपहार झाल्याचे आढळून आले. या संदर्भात आरोपी होळकर व पवार कोणता ही सबळ पुरावा सादर करू शकले नाहीत. त्यामुळे शासनाचा विश्वासघात करुन अत्यावश्यक वस्तू अधिनियम खालील तांदळाचा अपहार केल्याच्या आरोपावरुन तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार महेश गरड अधिक तपास करत आहेत. पोलिसांच्या या कारवाईत एकूण ९ हजार ४०० किलो तांदूळ सापडला. त्यातील १ हजार ५९ किलो तांदळाचा हिशेब लागला. उर्वरित ८ हजार ३५१ किलो तांदूळ आरोपींनी कोठून जमा केला हा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: Misappropriation of 9 thousand 400 kg of rice from cheap grain shop, bus of ST corporation used in the crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.