बारामतीतील ग्रामपंचायत कार्यालयात सदस्याचे गैरवर्तन; महिला सरपंचासहित कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 01:32 PM2021-07-21T13:32:57+5:302021-07-21T13:41:02+5:30
गोजुबावी ग्रामपंचायतीतील प्रकार; विनयभंगाचा गुन्हा दाखल ग्रामपंचायत सदस्यावर अॅट्रासिटी, विनयभंग, शासकिय कामात अडथळा आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल
उंडवडी कडेपठार : गोजूबावी येथील महिला सरपंचासह ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी, ग्रामसेवकास ग्रामपंचायत सदस्याने शिविगाळ व मारहाण केल्याचा प्रकार सोमवारी घडला आहे. याबाबत सबंधीत ग्रामपंचायत सदस्यावर अॅट्रासिटी, विनयभंग, शासकिय कामात अडथळा आदी कलमांतर्गत बारामती ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सरपंच माधुरी भगवान कदम यांनी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
बारामती ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण दामोदर आटोळे (रा. गोजुबावी, ता. बारामती) असे या ग्रामपंचायत सदस्याने नाव आहे. आटोळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोमवारी गोजुबावी ग्रामपंचायत कार्यालयात सदस्यांच्या मासिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कल्याण आटोळे हा मासिक बैठक सुरू होण्याआधी ग्रामपंचायत कार्यालयात येऊन मागील महिन्यात झालेल्या खर्चाचे हिशोब मागू लागला. यावेळी ग्रामसेवक सतिश बोरावके यांनी बैठक सुरू होऊ द्या.
सर्व हिशोब तुम्हाला दाखवण्यात येतील. असे सांगितले. मात्र यावेळी आटोळे याने अरेरावीची भाषा वापरत ग्रामसेवकास शिविगाळ केली. यावेळी संगणक परिचालक सचिन मगन गावडे यांनी आटोळे याला समजवण्याचा प्रयत्न केला असता गावडे यांना मारहाण करत शिविगाळ केली. हा प्रकार घडल्यानंतर ग्रामसेवक बोरावके व संगणक परिचालक गावडे गटविकास अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी बारामती येथे गेले. यानंतर घडलेल्या प्रकाराबाबत सरपंच माधुरी कदम ग्रामपंचायत कामगार अशोक भोसले व बापू केसकर यांनी माहिती दिली. यावेळी कल्याण आटोळे याने सरपंच माधुरी कदम यांचा हात पिरगळून, तुझी लायकी नाही सरपंच होण्याची असे म्हणून मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तसेच जातीवाचक शिविगाळ केली. या प्रकारानंतर सरपंच माधुरी कदम, ग्रामसेवक सतिश बोरावके, संगणक परिचालक सचिन गावडे व कर्मचाऱ्यांनी बारामती ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागिय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर करत आहेत.
''सहा महिन्यातून पहिल्यादाच हा सदस्य मासिक बैठकीला आला होता. सबंधीत ग्रामपंचायत सदस्य वारंवार त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचे सदस्य निलंबित करण्याबाबत गटविकास अधिकाºयांना प्रस्ताव देणार आहोत. असे सरपंच माधुरी भगवान कदम यांनी सांगितले.''