नादच खुळा! बऱ्हाणपूर ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार; आंदोलनासाठी 'भाऊ' चढले 'टॉवर'वर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2020 10:27 AM2020-11-06T10:27:48+5:302020-11-06T10:31:35+5:30
बारामती तालुक्यातील बऱ्हाणपूर येथील घटना
उंडवडी कडेपठार: बारामती तालुक्यातील बऱ्हाणपूर ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराबाबत आणि रस्त्यावरील अतिक्रमणाच्या संदर्भात तसेच इतर मागण्यांसाठी ग्रामपंचायत सदस्य अनिल गवळी यांनी आज सकाळी गावातील बीएसएनएलच्या टाॅवरवरती चढून आंदोलनाला सुरवात केली आहे..
गवळी म्हणाले,गायरान क्षेत्रावर झालेले अतिक्रमण तसेच गावठाण रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत गवळी यांनी वारंवार तक्रारी अर्ज केले होते.त्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये ठराव होऊनही अद्यापही अतिक्रमणे काढली गेली नाहीत. ग्रामपंचायत बऱ्हाणपूर येथील कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत,घरकुल योजनेमध्ये घरे पुर्ण झालेली आहेत असे दाखवून शासनाची ग्रामपंचायतीने फसवणुक केली असल्याचा आरोप देखील गवळी यांनी केला आहे.त्याच बरोबर अतिक्रमण करणाऱ्यांना हाताशी धरून माझेवर खोटे गुन्हे दाखल करून स्वत: केलेला भ्रष्टाचार दाबत आहे.
ग्रामपंचायतीच्या अंतर्गत निष्काळजीपणे झालेल्या कामामुळे १० वर्षापुर्वी एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागल्याचा प्रकार देखील दाबण्यात आलेला आहे.आणि मी वारंवार तक्रारी करीत असल्यामुळे ग्रामसेवक आणि सरपंच विनाकारणाने खोटे गुन्हे दाखल केलेल्या सर्व गुन्हयांची पुन्हा चौकशी करण्यात यावी.
एका ठिकाणी रस्ते मंजूर असताना ते रस्ते त्याठिकाणी न करता दुसऱ्याच ठिकाणी केलेले आहे.शासकीय काम पुर्ण झाल्यानंतर शासकीय फलक लावणे बंधनकारक असताना कोणत्याही कामाचे शासकीय फलक त्याठिकाणी लावण्यात आलेले नाहीत.शासनाकडून
मिळालेले ग्रंथालय,भांडी, लाऊडस्पीकर व इतर वस्तु वारंवार चोरीला गेले असून त्याबाबत विचारणा केली असता त्याबाबत ग्रामपंचायतसुध्दा तक्रार देण्यास जाणूनबुजून टाळाटाळ करत आहेत.गेली १० वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या सर्व कारभारची चौकशी करण्यात यावी.
या सर्व मागण्यांकरीता अनिल भानुदास गवळी यांनी आज सकाळी गावातील टाॅवरवर चढून आदोलनाला सुरवात केली आहे.या माहितीसाठी गटविकास अधिकारी राहूल काळभोर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.