शेती महामंडळाच्या मालमत्तेत गैरकारभार
By admin | Published: March 28, 2017 02:11 AM2017-03-28T02:11:42+5:302017-03-28T02:11:42+5:30
खंडकरी शेतकऱ्यांना जमिनी वाटप होऊनदेखील फलटण, माळशिरस आणि इंदापूर तालुक्यात हजारो एकर जमिनी
बारामती : खंडकरी शेतकऱ्यांना जमिनी वाटप होऊनदेखील फलटण, माळशिरस आणि इंदापूर तालुक्यात हजारो एकर जमिनी शिल्लक आहेत. या जमिनींवार मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. तसेच शेती महामंडळाचे अधिकारी नाममात्र किमतीत या जमिनी व शेती महामंडळाची मालमत्ता श्रीमंतवर्गाच्या घशात घालत आहेत. त्यामुळे शेती महामंडळामध्ये सध्या सुरू असलेल्या भ्रष्ट कारभाराची राज्य शासनाने चौकशी करावी, अशी मागणी समाजवादी शेतकरी, शेतमजूर पंचायतीचे अध्यक्ष माजी आमदार लक्ष्मण माने यांनी केली.
माने म्हणाले, ‘‘महाराष्ट्रमध्ये १९ ठिकाणी शेती महामंडळाच्या जमिनी होत्या. खंडकरी शेतकऱ्यांनी लढा दिल्यानंतर या जमिनी मूळ मालकांना माघारी मिळाल्या. मात्र अद्यापही माळशिरस, फलटण आणि इंदापूर तालुक्यात अद्यापही हजारो एकर जमिनी शेती महामंडळाकडे शिल्लक आहेत. त्यापैकी इंदापूर तालुक्यात सर्वाधिक ५ हजार एकराच्या पुढे जमीन शिल्लक आहे. मात्र शेती महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या जमिनी शिक्षण संस्था, उद्योगपती, मोठे बागायतदार यांना दिल्या आहेत.’’
याबाबत पालकमंत्री गिरीश बापट, विजय शिवतारे यांच्याशी चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत राज्य सरकारला ३ हजार अर्ज पाठवले आहेत, अशी माहितीही लक्ष्मण माने यांनी दिली. तसेच राज्य सरकारने या मागण्यांचा विचार न केल्यास १५ एप्रीलला साखरवाडी (फलटण) येथे मेळावा घेऊन मोर्चा काढणार असल्याचा इशारा माने यांनी दिला. या वेळी मच्छिंद्र जाधव, राजेंद्र माने, सुभाष जाधव, अशोक शिंदे, शंकर गोरे, बळवंत माने आदी उपस्थित होते.