साडेचार तासात चुकलेला मुलगा केला पालकांच्या स्वाधीन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 06:06 PM2019-09-03T18:06:05+5:302019-09-03T18:13:38+5:30
वडगांव बुद्रुक येथे रस्त्यावर तीन वर्षांचा लहान मुलगा रडत असताना एका नागरिकास आढळल्याने त्यांनी शंभर नंबरला फोन करून कळविले.
नऱ्हे : तीन वर्षांचा लहान मुलगा रस्त्यावर एकटा रडत असून त्याला नाव पत्ता सांगता येत नसल्याचे एका नागरिकाने फोन करून कंट्रोल रूमला कळविले. त्यानंतर सिंहगड रस्ता पोलिसांनी तातडीने त्या लहान मुलाच्या पालकांचा शोध सोशल मीडिया व सीसीटीव्हीच्या आधारे घेऊन अवघ्या साडेचार तासात त्या लहान मुलाला पालकांच्या स्वाधीन केले.
वडगांव बुद्रुक येथे रस्त्यावर तीन वर्षांचा लहान मुलगा रडत असताना एका नागरिकास आढळल्याने त्यांनी शंभर नंबरला फोन करून याबाबत कळवून पोलिसांना बोलाविले. वडगांव येथील सामाजिक कार्यकर्ते शिवभाऊ पासलकर, निखिल दांगट, अनिल कंधारे, अविनाश वांजळे, संजय पवळे आदींना ही बातमी समजताच त्यांनी सदर मुलाचा फोटो सोशल मीडियावर टाकून मुलाच्या पालकांना शोधण्याचे आवाहन केले. तसेच पोलिसांनी लहान मुलांसोबत या सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन परिसरातील भागात चौकशी केली. मात्र मुलाला कोणीच ओळखत नसल्याने शोधकार्यात अडचण येत होती. त्यांनतर बिट मार्शल सचिन तूपसौदर, पोलिस अधिकारी प्रल्हाद कडु, प्रकाश साळुंके यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेऊन सदर मुलाच्या आईवडिलांचा शोध घेतला. त्यानंतर त्यांना वडगांव चौकीत बोलावून मुलगा अरुण कुमार चव्हाण (वय ३ वर्षे ) यास त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.
..........
माझी तब्बेत बरी नसल्याने मी आमच्या नातेवाईकांकडे राहावयास आली होती. मी सकाळी अंघोळीस गेल्यानंतर माझा तीन वर्षांचा मुलगा अरुण हा मला न बाहेर गेला. मात्र थोड्यावेळाने आम्ही शोधाशोध करीत असताना शेजारील महिलेने आम्हास सोशल मीडियावर आलेला माज्या मुलाचा फोटो दाखविल्याने आम्ही तत्काळ वडगांव चौकीत गेलो. -रेश्मा चव्हाण, (मुलाची आई)