हरवलेले मूल ४८ तासांत विसावले आईच्या कुशीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:11 AM2021-02-16T04:11:37+5:302021-02-16T04:11:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिक्रापूर : येथील पाबळ चौकामध्ये काही कामानिमित्त आलेल्या महिलेचे दोन वर्षांचे हरवलेले मुल अखेर ४८ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिक्रापूर : येथील पाबळ चौकामध्ये काही कामानिमित्त आलेल्या महिलेचे दोन वर्षांचे हरवलेले मुल अखेर ४८ तासांनंतर आईच्या कुशीत विसावले.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पाबळ चौकातील मंगलमूर्ती मेडिकल समोर १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास एक लहान बाळ रडत असल्याचे मेडिकल चालक रविराज शिंदे यांना दिसले. त्यांनी त्या बाळाला जवळ घेत चौकशी केली असता काहीही माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे शिंदे यांनी त्या मुलाला शिक्रापूर पोलीस ठाण्यात घेऊन जात पोलिसांना माहिती देत त्या बालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी सदर दोन वर्षांचे बालक नुसताच रडत असल्याने शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक तेजस रासकर, मयूर कुंभार, महिला पोलिस नीता चव्हाण यांनी त्याचे फोटो काढून सोशल मीडियाच्या माध्यमातून गावातील व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये प्रसारित केले. मुलगा जास्त रडत असल्याने शेजारील हॉटेलवाले अशोक तक्ते यांच्याकडे सांभाळण्यास दिले. यावेळी लहान बालकाची आई त्याला सर्वत्र शोधत असताना काही नागरिकांनी त्यांचे बाळ पोलिसांकडे असल्याचे सांगितले. बाळाची आई सयती चौधरी यांनी तातडीने शिक्रापूर पोलीस ठाण्यात जाऊन बाळाबाबत विचारपूस केली. दरम्यान शिक्रापूर पोलिसांनी त्या बाळाला त्याच्या आईसमोर आणले असता त्याच्या आईने बाळाला पाहून हंबरडा फोडला. तर आपल्या सोनूला सुखरूप पाहून शिक्रापूर पोलिसांचे आभार मानत पोलीस आमच्यासाठी देवाच्या रूपाने भेटले असल्याची भावना व्यक्त केली.
फोटो - शिक्रापूर येथे हरवलेले बालक आईच्या ताब्यात देताना शिक्रापूर पोलीस. (धनंजय गावडे)