रघुनाथ कुचिकवर बलात्काराचा आरोप करणारी बेपत्ता तरुणी सापडली; लवकरच पुण्याला आणणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 04:11 PM2022-03-16T16:11:47+5:302022-03-16T16:16:30+5:30
शिवसेना कामगार नेते रघुनाथ बबनराव कुचिक याच्याविरोधात 24 वर्षीय तरुणीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता
पुणे : शिवसेना कामगार नेते रघुनाथ बबनराव कुचिक याच्याविरोधात 24 वर्षीय तरुणीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. कुचीकने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर ती गरोदर राहिली. त्यानंतर जबरदस्तीने तिचा गर्भपात करून त्या तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार तरुणीने केली होती. त्यानंतर तरुणी गायब झाली असे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सांगितले होते. वाघ यांनी मुलीला गायब केल्याचा कुचीकवर आरोपही केला होता. आता ही मुलगी गोव्यात आढळून आली आहे. या मुलीने स्वत: फोन करून मला ही माहिती दिल्याचे वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे.
दरम्यान बेपत्ता झालेल्या तरूणीचा कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नव्हता. तीचं काल लोकेशन पणजी दाखवत होते. पोलीस तसा तपास देखील करत होते. असे सांगत चित्रा वाघ यांनी ती मुलगी जिथं कुठे आहे ती सुखरूप असावी अशी प्रार्थना देखील केली होती. त्यासोबतच त्यांनी रघुनाथ कुचीक यानेच त्या मुलीला बेपत्ता केलं नसेल ना? असा सवाल देखील त्यांनी काल उपस्थित केला होता.
रघुनाथ कुचिक बलात्कार घटना
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 16, 2022
2दिवसांपासून गायब असलेली मुलगी
गोवा मडगावच्या कोलवा गावात सापडली
काल रात्री तिचा फोन मला आलेला
इंजेक्शन देऊन काही व्यक्ती ज्यात पोलिस ही होते पीडितेला महाराष्ट्रातून नेल्याची धक्कादायक माहिती तीने मला दिली
यासंदर्भात मी पुणे पोलिसांना सविस्तर कळवलयं pic.twitter.com/lTwvHSjvZz
तरुणीशी फोनवर बोलणं झालं
'शिवसेनेचा बलात्कारी नेता रघुनाथ कुचिकने अत्याचारित केलेली मुलगी दोन दिवसांपासून बेपत्ता होती. काल रात्री साडे अकराच्या सुमारास तिचा मला फोन आला होता. तिनं सांगितलं की मी कुठं आहे, मला माहिती नाही. पण मला मदतीची गरज आहे, असं ती म्हणाली. रात्रीची वेळ असल्याने मी तिला आजूबाजूच्या घरांचे दरवाजा ठोठवायला सांगितलं. त्यापध्दतीने तिनं केलं. एका गृहस्थाने मदत केली. त्यांच्याशी मी बोलले.
गोवा पोलिसांना दिली माहिती
कोलवा हे गोव्यातील मडगाव मधलं एक गाव आहे. असे त्या गृहस्थाने सांगितले. त्यानंतर मी त्या गृहस्थाला मुलीला घेऊन गोवा पोलिसांकडे जायला सांगितले. दरम्यानच्या काळात तिच्याशी मी बोलले. त्यावेळी तिनं सांगितलं की, काही लोकं होती, त्यात पोलीसही होते. मला इंजेक्शन देण्यात आली. माझ्याकडून काही पेपर्सवर सह्या घेतल्या. नंतर काय झालं आठवत नाही. आता याठिकाणी पडली आहे, असं मुलीनं सांगितल्याची माहिती वाघ यांनी दिली.
तरुणीला पुण्याला आणणार
मी ताबडतोब पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे यांच्याशी संपर्क साधून घटनेबाबत सांगितले. त्यानुसार आता पुणे शहर आणि ग्रामीणच्या टीम गोव्यात पोहचतील. मुलीचे आई-वडीलही घरून तिथं पोहचतील. मुलीला त्यांच्या ताब्यात देण्यात येईल, अशी माहितीही वाघ यांनी दिली.