‘मिसिंग लिंक’ने एक्स्प्रेस वेवरील वाहतूककोंडी टळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 12:31 PM2019-11-19T12:31:02+5:302019-11-19T12:34:33+5:30
खंडाळा घाटातील वाहतूककोंडीला वेगवान व पर्यायी रस्ता म्हणून हा मिसिंग लिंक उभा राहणार
लोणावळा : मुंबई-पुणे या दोन मेट्रो सिटीतील अंतर कमी व्हावे, याकरिता देशातील पहिला वेगवान मार्ग म्हणून यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गाची निर्मिती केली होती. या द्रुतगती मार्गाला आता २० वर्षे झाले आहेत. या मार्गावरील वाढलेली वाहनांची संख्या, सातत्याने होणारी वाहतूककोंडी व अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी या रस्त्याची क्षमता वाढविण्याकरिता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून खालापूर टोल ते कुसगावदरम्यान दोन व्हायाडक व दोन मोठे बोगदे असलेला मिसिंग लिंक बनविण्याचे काम वेगात सुरू केले आहे.
खंडाळा घाटातील वाहतूककोंडीला वेगवान व पर्यायी रस्ता म्हणून हा मिसिंग लिंक उभा राहणार आहे. या मार्गामुळे घाटातील वळण व जवळपास ६ किमी अंतर कमी होणार आहे, तसेच वाहतूक सुरक्षित होईलय सोबतच प्रवासातील २० ते २५ मिनिटे वाचतील, असे रस्ते विकास महामंडळाकडून सांगण्यात आले.
सोबतच खालापूर टोल ते खोपोली एक्झिटदरम्यानच्या जुन्या द्रुतगती मार्गावरदेखील दोन पदर वाढवीत मार्गाचे आठ पदरीकरण करण्यात येणार आहे. याकरिता डोंगराचा जवळपास १५ मीटर भागाचे सपाटीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सदरचा मिसिंग लिंक हा २८.७ किमी अंतराचा असून त्याला चौपदरी दोन मार्गिका असतील.
मिसिंग लिंकचा पहिला पूल हा ७७० मीटर लांब व ३० मीटर उंचीचा असेल. त्यापुढे चौपदरी दोन अनुक्रमे १.६ मीटर १.१२ किमी अंतराचे बोगदे असतील.
....
अभियांत्रिकी शास्त्राचा आविष्कार
मिसिंग लिंक या मार्गामुळे पावसाळ्यात व इतर वेळी अपघात व वाहतूककोंडीचे प्रमाणदेखील कमी होईल. सध्या कुसगाव परिसरासह ड्युक्स नोजच्या खालील बाजूला बोगदा बनविण्याचे काम सुरू आहे. खोपोली एक्झिटसमोर उड्डाणपुलाकरिता आवश्यक असणारे बिम बनविण्याचे काम सुरू आहे. पुढे काही अंतरावर डोंगराची खोदाई व सपाटीकरण ही कामे सुरू आहेत. हा पूल अभियांत्रिकी शास्त्राचा आविष्कार ठरणार आहे.
.......
वायू व ध्वनी प्रदूषण होणार कमी
४मिसिंग लिंकचे हे दोन्ही बोगदे प्रत्येकी पाचशे मीटर अंतरावर एका शाफ्टने क्रॉस पॅसेज बोगद्याने जोडलेले असेल जेथून आपत्कालीन स्थितीमध्ये वाहनांना बाहेर पडता येईल. तसेच हे दोन्ही बोगदे जमिनीखाली सरासरी दीडशे मीटर अंतरावर असतील. सदरची मिसिंग लिंक हा रस्ते विकास महामंडळ ईपीसी तत्त्वावर बांधणार आहे. ज्यामुळे इंधन व वायू तसेच ध्वनी प्रदूषण कमी होणार असून, तो झिरो फॅटल्टी कॉरिडोर बनविण्याकरिता उपयोगी ठरणार आहे.