बेपत्ता महिलेचा मृतदेह ३८ तासानंतर सापडला; रांजणखळगेच्या कुंडात घसरला होता पाय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 04:55 PM2023-08-10T16:55:49+5:302023-08-10T16:56:01+5:30
टाकळी हाजी कुंडावर हात पाय धुण्यासाठी गेलेली महिला शेवाळ खडकावरून पाय घसरून कुंडात वाहून गेली होती
टाकळी हाजी : रांजणखळगे परिसरातील कुंडातील खडकावर पाय धुण्यासाठी गेलेल्या वाशिम जिल्ह्यातील पदमाबाई शेषराव काकडे वय वर्षे ५५ या महिलेचा मृतदेह ३८ तासानंतर कुंडापासून सहाशे मिटर अंतरावर असलेल्या ठाकर वस्तीजवळील नदीत गुरुवार दिनांक १० रोजी सकाळी सात वाजता सापडला.
दुपारी शवविच्छेदन झाल्यावर सायंकाळी रांजणगाव ता. शिरुर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. ही महिला वाशिम येथून रांजणगाव एम आय डी सी मध्ये कामाला असलेल्या जावई महेंद्र शहादेव औताडे यांच्याकडे आली होती. त्यानंतर औताडे यांचे कुटुंबीय देवी दर्शनासाठी टाकळी हाजी कुंडावर आले होते. हात पाय धुण्यासाठी ही महिला खडकाजवळ गेली. शेवाळ खडकावरून पाय घसरून तोल सावरता न आल्याने कुंडात वाहून गेली. जावई महेंद्र औताडे यांनी प्रयत्न करुनही सासुला वाचवण्यास त्यांना अपयश आले. काकडे व औताडे कुटुंबीय व त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने कुंडावर आले होते.
हेडकॉन्स्टेबल डहाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेली ३८ तास शोधमोहीम राबवून मृतदेह सापडण्यासाठी परिश्रम घेतले. पाटबंधारे विभागाचे निघोज शाखाधिकारी पाटील यांनी कुंडाचे पाणी कमी करण्यासाठी प्रयत्न केले. पारनेर तालुका पत्रकार संघाचे निघोज शहाराध्यक्ष योगेश खाडे, संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते नानापाटील वराळ व ग्रामस्थांनी पोलीसांना सहकार्य केले.