पुण्यातून ९ वर्षांपूर्वी गायब झालेला तरुण बनला माओवादी कमांडर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 02:00 PM2019-07-10T14:00:54+5:302019-07-10T14:02:31+5:30
भवानी पेठेतील कासेवाडी झोपडपट्टी येथे तो राहायला होता. मात्र,नोव्हेंबर २०१०पासून बेपत्ता होता.
पुणे : पुण्यातून ९ वर्षांपूर्वी गायब झालेला तरुण छत्तीसगडमध्ये माओवादी गटाचा कमांडर झाल्याचे समोर आले आहे. याबाबत छत्तीसगडपोलिसांनी जाहीर केलेल्या माओवाद्यांच्या यादीत या व्यक्तीचा समावेश आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संतोष वसंत शेलार ऊर्फ विश्वा हा भवानी पेठेतील कासेवाडी झोपडपट्टी येथे राहायला होता. तो नोव्हेंबर २०१०पासून बेपत्ता असून जानेवारी २०११मध्ये त्या संबंधीची तक्रार खडक पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. तो विश्वा नावाने ओळखला जातो. छत्तीसगड पोलिसांनी कार्यरत असणाऱ्या माओवाद्यांच्या यादीत विश्वा हा राजनंदगावामधील तांडा विभागातील माओ कमिटीचा डेप्युटी कमांडर असल्याचे म्हटले आहे. २५ मार्च २०१९ या दिवशी बनवण्यात आलेल्या या यादीत पुण्यातील २८ वर्षाच्या विश्वाच्या नावासह छायाचित्रही सामील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तांडा विभागात १४ व्यक्तींचा समावेश असून विश्वा याचा क्रमांक चौथा आहे. शिवाय त्याच्याकडे ३०३ क्रमांकाची रायफलही आहे. त्याच्या छायाचित्रावरुन त्याची ओळख पटली आहे़
त्याच्या वैयक्तिक माहितीमध्ये त्याने इयत्ता ९ वीनंतर शाळा सोडल्याचे समजते. तो त्याच्या चित्रकलेसाठी ओळखला जात होता. त्याने पुण्यातील कबीर मंचामध्ये सहभाग नोंदवल्याचे समजते. मुंबईला प्रदर्शनाच्या कामासाठी जाण्याचे कारण सांगून ७ नोव्हेंबर २०१० मध्ये घरातून बाहेर पडला़. त्यावेळी त्याने आपल्याला दोन महिन्यांसाठी मुंबईच्या प्रदर्शनासाठी काम मिळाले तो बाहेर पडला, असे त्याच्या कुटुंबीयांनी नोंदवलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
याशिवाय त्याच्यासोबत गायब झालेल्या पुण्यातील अजून एका युवकही बंदी असलेल्या माओ गटात सहभागी झाल्याचे समजते. प्रशांत कांबळे हा पुण्यातील ताडीवाला रस्त्यावरील झोपडपट्टी भागात राहणारा युवक शेलारसोबत बेपत्ता झाला होता. २०११ साली महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाने कबीर कला मंचच्या काही सभासदांना अटक केली होती. यावेळी कांबळे व शेलार फरार झाले होते.
़़़़़़़़़
* मुलाची आठवण येते पण कुठे आहे माहिती नाही
याबाबत संतोषचे ६५वर्षांचे वडील वसंत शेलार म्हणतात की, तो लहानपणापासून अतिशय प्रेमळ मुलगा होता. अगदी सुरुवातीपासून त्याला चित्रकलेत रस होता. मुलाची आठवण येते पण तो कुठे आहे याची माहिती नाही. या बाबतीत पोलीस किंवा कोणत्याही व्यक्तीने संपर्क केलेला नाही.