‘मिशन बारामती’चा गणेशोत्सवातच होणार ‘श्रीगणेशा’; भाजपची शनिवारी बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 06:39 PM2022-09-02T18:39:58+5:302022-09-02T18:40:08+5:30
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन, भाजपचे प्रदेशअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार राम शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा होणार
बारामती : बारामती लोकसभा मतदार संघात नियोजित भाजप बारामती लोकसभा मतदारसंघ मिशन २०२४ च्या तयारीसाठी गणेशोत्सवातच भाजप ने ‘श्रीगणेशा’ केला आहे. त्याच्या व्युहरचनेसाठी शनिवारी बारामतीत भाजपची महत्वाची बैठक आयोजित केली आहे. लोकसभा मतदारसंघात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन, भाजपचे प्रदेशअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार राम शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रदेश किसान मोर्चाचे अध्यक्ष वासुदेव काळे यांनी दिली.
बारामतीत शुक्रवारी आयोजित पत्रकार परीषदेत बोलताना काळे यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबत माहिती दिली. यावेळी भाजपचे बारामती लोकसभा प्रमुख अविनाश मोटे, तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे, शहराध्यक्ष सतिश फाळके, माळेगावचे माजी अध्यक्ष रंजन तावरे, अॅड. जी. बी. गावडे, दादासाहेब कोकणे उपस्थित होते.
आगामी बारामती लोकसभा निवडणुक भाजप चे ‘लक्ष्य’ असल्याचे संकेत जणु यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिले. त्यासाठी भाजपकडून बारामती लोकसभा मतदारसंघात संघटनात्मक बांधणी करण्यासह, कार्यकर्त्यांना बळ देणे, बुथ कमिट्यांना स्फूर्ती यावी, केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यावर भर देण्यात येणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पाश्वभूर्मीवर या मतदारसंघात लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. काही बडे नेते भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याची देखील चर्चा आहे. त्यामुळे भाजप ‘बारामती’ला खिंडार पाडण्यात कितपत यशस्वी होणार याकडे लक्ष लागले आहे.
शनिवार व रविवार(दि. ३ व ४) रोजी लोकसभा प्रभारी आमदार राम शिंदे लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. शनिवारी सायंकाळी ते बारामतीत दाखल होणार आहेत. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंगळवारी(दि.६) तालुक्यात भेट देणार आहेत. या दौऱ्यात बुथ कमिट्या, सोशल मिडीयाची टीम, प्रमुख पदाधिकाऱ्यांना भेटणे तसेच माळेगाव व काटेवाडी या राजकीयदृष्ट्या महत्वाच्या गावांमध्ये कार्यकर्त्यांसमवेत चर्चा करणार आहेत. दरम्यान,केंद्रीयमंत्री निर्मला सीतारमन या सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.