जिल्हा प्रशासन विकासकामांच्या मिशन मोडवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:12 AM2021-05-26T04:12:09+5:302021-05-26T04:12:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यातील सर्वच विकासकामे ठप्प होती. परंतु, आठ दिवसांपासून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यातील सर्वच विकासकामे ठप्प होती. परंतु, आठ दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्याने आता पुन्हा एकदा रखडलेल्या विकासकामांना गती देण्यात येणार आहे. यासाठी पुण्याचे जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख मिशन मोडवर असून, गेल्या दोन दिवसांत त्यांनी रिंगरोड, पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गाच्या भूसंपादनासंदर्भात बैठका घेऊन गती दिली आहे.
जिल्ह्यात मार्च महिन्यातच कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली, पण तुलनेत रुग्ण संख्या कमी होती. यामुळेच मार्चअखेर वर्षभर रखडलेली विकासकामे मार्गी लागली. परंतु एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगाने वाढण्यास सुरुवात झाली. यामुळेच शासनाने देखील एप्रिलमध्ये संपूर्ण राज्यातच लाॅकडाऊन लागू केला. जिल्हा प्रशासन तर गेले दोन महिने दिवस- रात्र केवळ कोरोनाच्या उपयायोजना करण्यात व्यस्त होते. गाव पातळीपासून, तालुका आणि जिल्हा स्तरावरील सर्व यंत्रणा कोरोनाच्या कामात व्यस्त होती. यामुळे सर्व विकासकामे पूर्णपणे ठप्प होती. आता जिल्ह्यातील एमएसआरडीसीचा रिंगरोड, पालखी मार्ग, शिवनेरी व भीमाशंकर विकास आरखडा, देहू, आळंदी तीर्थक्षेत्र विकास आराखडा व अष्टविनायक विकास आरखडा या सर्व रखडलेल्या विकासकामांना गती देणार असल्याचे जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी सांगितले.
-------
विकासकामे मार्गी लावण्यासाठी बैठका
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून विकासकामांसह सर्वच गोष्टींवर परिणाम झाला आहे. त्यात गेले दोन महिने, तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली, या वाढलेल्या रुग्ण संख्येला सर्व सोयी-सुविधा पुरविणे आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी जिल्हा प्रशासन दिवसरात्र काम करत आहे. परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव थोडा कमी झाल्याने रखडलेली विकास कामे पुढे जाण्यासाठी बैठका सुरू केल्या आहेत.
- डाॅ.राजेश देशमुख, जिल्हाधिकारी