आंबेगाव-जुन्नरसाठी ‘मिशन पेसा’ - आयुष प्रसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 02:16 AM2018-05-10T02:16:28+5:302018-05-10T02:16:28+5:30
आदिवासी गावांना पेसा अंतर्गत मिळालेला निधी ३१ डिसेंबरपर्यंत खर्च झाला पाहिजे. ग्रामसभा घेऊन गरजेनुसार विकासकामांचे प्रस्ताव पंचायत समितीमार्फत आदिवासी विभागाकडे सादर करावेत. यासाठी उपजिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आंबेगाव व जुन्नर तालुक्यात ‘मिशन पेसा’ ही मोहीम सुरू केली आहे.
डिंभे - आदिवासी गावांना पेसा अंतर्गत मिळालेला निधी ३१ डिसेंबरपर्यंत खर्च झाला पाहिजे. ग्रामसभा घेऊन गरजेनुसार विकासकामांचे प्रस्ताव पंचायत समितीमार्फत आदिवासी विभागाकडे सादर करावेत. यासाठी उपजिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आंबेगाव व जुन्नर तालुक्यात ‘मिशन पेसा’ ही मोहीम सुरू केली आहे. आदिवासी गावांना समक्ष भेटी देऊन पेसा अंतर्गत झालेल्या विकासकामांची पाहणी ते स्वत: करणार आहेत. याचाच एक भाग म्हणून त्यांनी आंबेगाव तालुक्यातील राजेवाडी व जांभोरी या गावांना भेटी देऊन आढावा घेतला. गावागावांत ग्रामसभा घेऊन आवश्यकतेनुसार मूलभूत सुविधांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी मार्गदर्शन केले.
आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील आदिवासी गावांना पेसा कायद्याअंतर्गत गावागावांत मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी गावातील लोकसंख्येच्याप्रमाणात दरवर्षी निधी उपलब्ध होतो. मात्र, मिळालेला हा निधी योग्य वेळी योग्य त्या कामांवर खर्च होत नसल्याने अनेक ग्रामपंचायतींकडे पेसाचा निधी पडून राहत आहे. यामुळे आदिवासी गावांतील मूलभूत सुविधांसाठी पुरविण्यात येत असलेल्या निधीचा पुरेपुर उपयोग होत नसल्याची बाब लक्षात आल्यामुळे उपजिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जुन्नर व आंबेगाव तालुक्यात याबाबत मिशन पेसा या नावाने मोहीम सुरू केली आहे.
या मोहिमेअंतर्गत दोन्ही तालुक्यासाठी गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन टीम तयार करण्यात आल्या आहेत. या टीममध्ये गटविकास अधिकारी, पेसा समन्वयक, प्रकल्प कार्यालयाचे नियोजन अधिकारी, वरिष्ठ निरीक्षक यांचा यात समावेश आहे. टीमसोबत उपजिल्हाधिकारी स्वत: आदिवासी गावांना भेटी देऊन पेसाअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेत आहेत.
या वेळी पेसाचा निधी खर्च न झाल्याने ग्रामपंचायतींच्या खात्यावर पडून असल्याने त्यांनी खंत व्यक्त केली. हा अखर्चित निधी ३१ डिसेंबरपर्यंत खर्च करण्याबाबत निर्देश दिले. यावेळी राजेवाडी येथील ग्रामस्थांनी घनकचरा व्यवस्थापन व साबळेवाडी ते पोखरी जोडरस्त्याच्या डागडुजीसाठी निधीची मागणी केली. तर जांभोरी येथील ग्रामस्थांनी कळंबई रस्ता, काळवाडी ते भोकटेवाडी रस्त्यासाठी निधीची गरज असल्याचे सांगीतले.
यावेळी आंबेगाव तालुका गटविकास अधिकारी राहुल काळभोर, जिल्हा पेसा समन्वयक विनोद इंगोले, प्रकल्प कार्यालयाचे नियोजन अधिकारी दिलीप पिंपळेकर, वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल चव्हाण, राजेवाडीचे सरपंच बेलनाथमहाराज जांभोरी-राजेवाडी गावचे ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, ग्रामसेवक उपस्थित होते.
प्रस्ताव सादर करा
- राजेवाडी व जांभोरी येथील सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले, की गावागावांत ग्रामसभा घेवून रस्ते, पाणीपुरवठा, पशुसंवर्धन, या बरोबरच गावाला आवश्यक असणाºया मूलभूत सुविधांची गरजेनुसार क्रमवारी ठरवून प्रस्ताव गटविकास अधिकारी यांच्याकडे ६ मेपर्यंत सादर करावेत.
- वैयक्तिक स्वरूपाच्या लाभाचे प्रस्तावही सादर करावेत, हे प्रस्ताव आदिवासी विभागाकडे प्राप्त झाल्यावर तातडीने निधी उपलब्ध करून देण्यात येईल.