पोलीस परवानगीचा घोळ :चुका पोलिसांच्या; मनस्ताप मात्र नागरिकांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 02:08 AM2018-09-23T02:08:45+5:302018-09-23T02:08:57+5:30
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यांनी पोलिसांकडे रीतसर आॅनलाईनवर परवानगी मागितली.
पुणे - गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यांनी पोलिसांकडे रीतसर आॅनलाईनवर परवानगी मागितली़ पण, दोन पोलीस ठाण्यांनी ऐनवेळी वेगवेगळ्या मार्गाने मिरवणूक नेण्यासाठी परवानगी दिली़ पोलिसांमधील समन्वयाअभावी मिरवणूक वेगळ्या मार्गाने नेल्याबद्दल व वाहतुकीला अडथळा आणल्याबद्दल उलट डेक्कन पोलिसांनी या कंपनीचे प्रमुख व त्यांच्या कर्मचाºयांना गुन्हेगारांप्रमाणे वागणूक देऊन कारवाई करून त्यांच्यातील दहा जणांना अटक केली़
याबाबत अभि इॅम्पॅक्ट लॉजिस्टिक्स सोल्युशन या कंपनीचे प्रमुख जितेंद्र जोशी त्यांनी आपल्यावर व कर्मचाºयांवर बेतलेल्या या प्रकाराची माहिती दिली़ त्यांनी सांगितले, की आमची देशभर कार्यालये असून सुमारे ६ हजार कर्मचारी काम करतात़ आमच्या गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी आम्ही १ सप्टेंबर रोजीच पोलिसांकडे आॅनलाईन अर्ज केला होता़ परंतु १८ सप्टेंबरपर्यंत कोणतीही परवानगी मिळाली नाही़ तेव्हा चतु:शृंगी पोलीस ठाण्यात जाऊन आमच्या कर्मचाºयाने त्यांच्याकडून मिरवणूक मार्गाची परवानगी आणली़ त्यात जनवाडी, दीप बंगला, ज्ञानेश्वर पादुका असा मार्ग देण्यात आला होता़ ज्ञानेश्वर पादुकांच्या पुढे त्यांनी मार्गच दिला नाही़ आता तेथे गणेश विसर्जनाची कोणतीही सोय नाही़ विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी डेक्कन पोलीस ठाण्यातून परवानगीसाठी फोन आला़ तेव्हा आमचा एक कर्मचारी तेथे गेला़ त्यांनी दुपारी साडेतीन वाजता जनवाडी, सिम्बायोसिस अशा दुसºयाच मार्गाची परवानगी दिली़ तोपर्यंत आमची मिरवणूक दीप बंगला चौकात आली होती़ ती पुन्हा उलटी नेणे शक्य नसल्याने आम्ही ज्ञानेश्वर पादुका चौकातून फर्ग्युसन रोड व तेथून शिरोळे रोडला मिरवणूक आणली़ शिरोळे रोडला मिरवणूक आली तेव्हा ढोल पथकाने वादन थांबवून ढोल पाठीवर घेतले होते़ अनेक जण आपापल्या गाडीवर घाटावर जात होते़ त्यावेळी डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक हेमंत भट व त्यांचे सहकारी तेथे आले़ त्यांनी स्पीकर व जेवणाची गाडीही जप्त केली़ तेव्हा त्यांनी आमचे मोबाईल काढून घेतले़ रात्री उशिरा आम्हाला समन्स देऊन घरी सोडले व दुसºया दिवशी न्यायालयात बोलावले़ पण पोलीस आलेच नाहीत.
आम्ही कोणी गुन्हेगार नाही़ पोलिसांनी अगोदर दिलेल्या आदेशानुसारच मिरवणूक काढली होती़ आता त्यांच्या दोन पोलीस ठाण्यांमध्ये समन्वय नाही़ ऐनवेळी मिरवणुकीची वेळ उलटून गेल्यावर दुसºया मार्गाची परवानगी दिली़ या पोलिसांच्या चुका असताना त्याची शिक्षा मात्र आम्हाला दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले़ मिरवणुकीसाठी दिलेला मार्ग बदलला आणि वाहतूक अडथळा आणल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे डेक्कन पोलिसांनी सांगितले़