चुका ‘सेट’च्या, भुर्दंड विद्यार्थ्यांना, प्रश्नपत्रिकेत असंख्य चुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 04:15 AM2018-03-06T04:15:29+5:302018-03-06T04:15:29+5:30
राज्यभरातील विविध विषयांच्या सहायक प्राध्यापकपदाची पात्रता परीक्षा (सेट) घेणाºया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाकडून अनेक विषयांच्या प्रश्नपत्रिकेतील उत्तरे चुकीची देण्यात आली आहेत. या उत्तरांची दुरुस्ती करण्यासाठी मात्र प्रतिप्रश्न हजार रुपये अनामत भरण्याचा नियम सेट विभागाने लागू केला आहे.
पुणे - राज्यभरातील विविध विषयांच्या सहायक प्राध्यापकपदाची पात्रता परीक्षा (सेट) घेणाºया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाकडून अनेक विषयांच्या प्रश्नपत्रिकेतील उत्तरे चुकीची देण्यात आली आहेत. या उत्तरांची दुरुस्ती करण्यासाठी मात्र प्रतिप्रश्न हजार रुपये अनामत भरण्याचा नियम सेट विभागाने लागू केला आहे. त्यामुळे चुका सेट विभागाच्या; मात्र त्याचा आर्थिक भुर्दंड विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे.
सहायक प्राध्यापकपदासाठी नेट किंवा सेट परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या देखरेखीखाली नेट परीक्षा सीबीएसई बोर्डाकडून, तर सेटची परीक्षा महाराष्ट्र आणि गोवा राज्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाकडून घेतली जाते. या सेट विभागाकडून ५० पेक्षा जास्त विषयांची परीक्षा घेतली जाते.
सेट विभागाकडून २८ जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या सेट परीक्षेची उत्तरसूची नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या उत्तरसूचीमधील अनेक प्रश्नांची उत्तरे चुकीची दर्शविण्यात आली आहेत. यामध्ये अनेक विषयांच्या प्रश्नपत्रिकेमधील प्रश्नांची उत्तरे चुकीची देण्यात आल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहेत. एकट्या शिक्षणशास्त्र विषयातील ११ प्रश्नांची उत्तरे चुकल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे. त्याचे संदर्भासहित पुरावेही विद्यार्थ्यांनी सादर केले आहेत. त्याचबरोबर पहिल्या पेपरमधील दोन प्रश्न चुकले आहेत. राज्यशास्त्राच्या पेपर दोन व तीन मधील काही प्रश्न चुकले आहेत. हीच परिस्थिती थोड्याबहुत फरकाने इतर विषयांचीही आहे.
उत्तरसूचीमध्ये चुकीची दर्शविण्यात आलेली ही उत्तरे दुरुस्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना सेट विभागाकडे तक्रार दाखल करायची असेल, तर प्रतिप्रश्न हजार रुपये नियमानुसार भरणे आवश्यक आहे. शिक्षणशास्त्र विषयाच्या ११ चुकीच्या प्रश्नांसाठी ११ हजार रुपये विद्यार्थ्यांना अनामत रक्कम म्हणून जमा करावी लागेल, तर त्याची तथ्यता सेट विभागाकडून तपासली जाणार आहे. मात्र, हे ११ हजार रुपये कुठून भरायचे, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
प्रत्येक विषयासाठी पेपर एक, दोन व तीन असे तीन पेपर
असतात. पेपर एक सर्व विषयांसाठी समान असतो, तर पेपर २ व ३ प्रत्येक विषयाचे स्वतंत्र असतात. याच्या प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी
तज्ज्ञ प्राध्यापकांची समिती कार्यरत असते. विविध संदर्भांचा वापर करून त्यांनी प्रश्न काढून त्याचे उत्तर देणे अपेक्षित असते.
इतके पैसे भरायचे कुठून? : ११ प्रश्नांची उत्तरे चुकलेली
1 सेट विभागाने दिलेल्या उत्तरसूचीमध्ये विविध विषयांतील अनेक प्रश्नांची उत्तरे चुकीची दिली असल्याचे दिसून येत आहे. याबाबत सेट विभागाकडे तक्रार करण्यासाठी प्रतिप्रश्न हजार रुपये विद्यार्थ्यांना भरायचे आहेत.
2एकट्या शिक्षणशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील ११ प्रश्नांची उत्तरे चुकली आहेत. यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रतिप्रश्न हजार असे ११ हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. मात्र, इतके पैसे विद्यार्थ्यांनी कुठून आणायचे, असा सवाल त्यांच्याकडून केला जात आहे.
तज्ज्ञ समितीची उत्तरे चुकतात कशी?
सेट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका काढण्यासाठी प्रत्येक विषयानिहाय तज्ज्ञ प्राध्यापकांची समितीची नियुक्ती केलेली असते. ही समिती विविध संदर्भांचा आधार घेऊन प्रश्नपत्रिका व त्याची उत्तरसूची तयार करून देते. मात्र, तरीही दर वर्षी असंख्य प्रश्न व त्यांची त्यांनी दिलेली उत्तरे चुकत असल्याचे वारंवार घडत आहे. हजारो रुपये मानधन घेऊन प्रश्नपत्रिका काढणाºया समितीच्या व सेट विभागाच्या ढिसाळ कारभाराबद्दल विद्यार्थ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.