आंतरराष्ट्रीय सहलीच्या नावाखाली एमआयटीने जमा केले कोट्यवधी रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:09 AM2021-05-28T04:09:47+5:302021-05-28T04:09:47+5:30
पुणे : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीने आंतरराष्ट्रीय सहलीच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी २ लाख रुपये शुल्क जमा केले आहे. मात्र, ...
पुणे : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीने आंतरराष्ट्रीय सहलीच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी २ लाख रुपये शुल्क जमा केले आहे. मात्र, कोरोनामुळे परदेशात सहल गेलीच नाही. त्यामुळे सर्व शुल्क परत करावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. परंतु, एमआयटीकडून शुल्क देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगितले जात आहे.
एमआयटीतर्फे विद्यार्थ्यांकडून नियमित शुल्काव्यतिरिक्त केवळ आंतरराष्ट्रीय सहलीच्या नावाखाली सलग चार वर्षे प्रत्येक विद्यार्थ्याकडून ५० हजार रुपये शुल्क जमा केले जाते. सर्व विद्यार्थ्यांचे सुमारे तीस कोटी रुपये शुल्क एमआयटी विद्यापीठाकडे जमा झाले असल्याचा दावा काही विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. यापुढे कोरोनामुळे परदेशात कुठेही सहज सहल काढणे शक्य होणार नाही. तरीही एमआयटीकडून शैक्षणिक सहलीसाठीचे शुल्क वसूल केले जात आहे. तसेच शुल्क न भरणा-या विद्यार्थ्यांचा निकाल दिला जात नाही.
विद्यार्थी उत्तीर्ण होऊन बाहेर पडल्यानंतर त्यांची सहल परदेशात घेऊन जाणे उचित ठरत नाही. त्यामुळे एमआयटीने आंतरराष्ट्रीय सहलीसाठी घेतलेले शुल्क परत करावे, अशी मागणी विद्यार्थी व पालकांनी केली आहे. एमआयटीकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे काही विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत हस्तक्षेप करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.