एमपीएसीच्या परीक्षा पुढे ढकल्याने संमिश्र भावना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:10 AM2021-04-10T04:10:46+5:302021-04-10T04:10:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने येत्या रविवारी ११ एप्रिल रोजी होणारी राज्य सेवा पूर्व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने येत्या रविवारी ११ एप्रिल रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा येत्या रविवारी होणार होती. मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील काही विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी काही विद्यार्थ्यांनी केली होती. परंतु परीक्षा पुढे ढकल्यामुळे काही विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्याच्या इतर जिल्हातून विद्यार्थी पुणे शहरात येऊन परीक्षेची तयारी करीत असतात. एवढे दिवस येथे राहून वेळेवर परीक्षा पुढे ढकळण्यात आली त्यामुळे काहींनी नाराजी व्यक्त केली आहे.
कोरोना असतानाही आम्ही पुण्यात राहिलो आणि वेळेवर परीक्षा होणार नाही. त्यामुळे आता पुण्यात राहायचे की गावी वापस जायचे असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. काही दिवस आधी तरी सूचना देणे अपेक्षित होते. असेही काही विद्यार्थीनी सांगितले.
---
परीक्षेची नवीन तारीख घोषीत झाली नाही. तोपर्यत विद्यार्थीना पुण्यात राहावे लागेल. मेस, रुमभाडे याचा खर्च वाढणार आहे. अनिश्चीत तारीख असल्याने विद्यार्थी अस्वस्थ झाले आहेत. परीक्षा झाल्यावर विद्यार्थी मूळ गावी गेले असते. त्याचा सर्व खर्च वाचला असता. अचानक निर्णय झाल्याने काही विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. अनेकांनी पुण्याकडे येण्यासाठी तिकिटबुक केले होते. गोंधळेलेले सरकार पूर्वकल्पना न देता असे वारंवार निर्णय का घेत आहेत?
- कुलदीप आंबेकर, अध्यक्ष स्टुडंट हेल्पींग हँड
---
सरकारने जो निर्णय घेतला आहे. तो निश्चितपणे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करत घेतला आहे. त्यामुळे आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो. सकाळी पर्यंत विद्यार्थ्यांच्या मनात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. विद्यार्थ्यांमध्ये स्पष्टता नव्हती. मात्र, या निर्णयामुळे गोंधळ संपला आहे. एकंदरित अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये कोरोनाची भीती तर आहेच. त्याचप्रमाणे पुढील परीक्षा कधी होईल यांची ही भिती आहे. आता जरी परीक्षा पुढे ढकलली असली तरी सरकारने लवकर परीक्षेसाठी पुढील तारीख कळवावी.
- शर्मिला येवले, विद्यार्थिनी
----
सर्वत्र कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. त्यामुळे हा निर्णय योग्य आहे. परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी एकत्र आल्यास विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा निर्णय योग्य आहे.
- प्रतीक आसरकर, विद्यार्थी
---
सरकारने परीक्षा पुढे ढकळली आहे. परंतु, पुढे कधी होणार हे सांगितले नाही. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. पुढील तारीख कळवावी म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनातील गोंधळ कमी होईल.
- पवन मेटकर, विद्यार्थी