दहावी परीक्षा रद्दवर संमिश्र प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:11 AM2021-04-21T04:11:26+5:302021-04-21T04:11:26+5:30
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) घेतलेल्या निर्णयानुसार राज्य शासनाने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्दचा निर्णय घेतला. तसेच ...
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) घेतलेल्या निर्णयानुसार राज्य शासनाने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्दचा निर्णय घेतला. तसेच आता अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाणार आहे. मात्र, शिक्षण वर्तुळातून याबाबत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. तसेच दहावी नंतरच्या अभ्यासक्रमांना प्रवेश कसा देणार असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
--
राज्य शासनाने चुकीचा निर्णय घेतला असून विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलणे अपेक्षित होते. जून-जुलैमध्ये परीक्षा घेता आल्या असत्या. बारावीच्या परीक्षा होणार आहेत. त्यामुळे दहावीच्यासुद्धा परीक्षा घेणे शक्य झाले असते. राज्यातील सुमारे ९० टक्क्यांहून अधिक पालक व विद्यार्थी परीक्षा देण्याच्या मानसिकतेत होते. मात्र, आता त्यांची निराशा झाली आहे.
- डॉ. अ. ल. देशमुख, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ
--
कोरोनामुळे राज्याची परिस्थिती गंभीर झाली असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास राज्य शासनाने प्राथमिकता दिली आहे. आणखी किती दिवस ही परिस्थिती अशीच राहील याबाबत काहीही सांगता येत नाही. त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतलेला असावा. परंतु, दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करताना अंतर्गत मूल्यमापन प्रक्रियामध्ये पारदर्शकता ठेवणे गरजेचे आहे.
- डॉ. वसंत काळपांडे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ
--
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाने इयत्ता दहावीच्या परीक्षा घ्यायला हव्या होत्या.
- सुनील मगर, माजी संचालक, बालभारती