‘पीएसआय’ पदासाठी मैदानी चाचणी पात्रता हटवण्याच्या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:08 AM2021-05-28T04:08:53+5:302021-05-28T04:08:53+5:30

अमोल अवचिते पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) गट ब या पदासाठी मैदानी चाचणीचे ...

Mixed reaction to the decision to remove the field test eligibility for the post of ‘PSI’ | ‘पीएसआय’ पदासाठी मैदानी चाचणी पात्रता हटवण्याच्या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया

‘पीएसआय’ पदासाठी मैदानी चाचणी पात्रता हटवण्याच्या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया

Next

अमोल अवचिते

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) गट ब या पदासाठी मैदानी चाचणीचे गुण यापुढे केवळ अहर्ताकारी (पात्र) करण्यात आले आहेत. एकूण शंभर गुणांपैकी ६० गुण मिळविलेल्या उमेदवारांना मुलाखत देता येणार आहे. अंतिम निवड करताना मैदानी चाचणीचे गुण विचारात घेतले जाणार नसून केवळ मुख्यपरीक्षा आणि मुलाखतीच्या गुणांच्या आधारेच अंतिम निवड करण्यात येणार आहे, अशी घोषणा एमपीएसीने केली आहे. या निर्णयावर स्पर्धा परीक्षा क्षेत्रातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे.

एकतर्फी निर्णय घेतल्याने ग्रामीण भागातील उमेदवारांचे नुकसान होणार आहे. ग्रामीण भागातील उमेदवारांना अधिकारी होऊ द्यायचे नाही, हे मुख्य कारस्थान आहे. त्यामुळे हा निर्णय रद्द करण्यात यावा, अशी संतापजनक प्रतिक्रिया काही उमेदवारांनी व्यक्त केली. तर या निर्णयामुळे अनेक उमेदवारांना नव्याने संधी मिळू शकते. सर्व समान पातळीवर आले असल्याने केवळ बैद्धिक अथवा मैदानी चाचणीत प्रवीण असलेल्यांचीच निवड न होता, समान संधी मिळू शकेल, असे काहींचे म्हणणे आहे.

कोट---

एमपीएससीने घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक आहे. या निर्णयातून मैदानी चाचणीला दुर्लक्षित करण्यात आलेले नाही. शारीरिक आणि बैद्धिकदृष्ट्या सक्षम उमेदवार पोलीस खात्याला मिळतील. गुन्ह्यांची उकल करताना बैद्धिक क्षमतेचा कस लागतो. या निर्णयाने कोणत्याही उमेदवारांचे नुकसान होणार नसून समान संधी मिळेल.

- मीरा बोरवणकर, माजी पोलीस आयुक्त, पुणे शहर.

या निर्णयाचा फायदा फक्त गुणवंतांना होईल. तर शारीरिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या उमेदवारांना तोटा होणार आहे. शारीरिकदृष्ट्या सक्षम उमेदवारांना प्रशिक्षण देऊ शकतो. असे एमपीएसीचे म्हणणे असेल, तर प्रशिक्षण केंद्रामध्ये कायद्याचे प्रशिक्षण देऊन परीक्षा घेतली जाते. त्यामुळे कायद्याचा अभ्यासक्रम मुख्य परीक्षेमधून वगळून उमेदवारांना पात्र करावे आणि अंतिम निवड यादीत गुण ग्राह्य धरू नयेत.

- प्रताप शिंदे, / संदीप जाधव परीक्षार्थी.

निर्णय चुकीचा आहे. पीएसआय हे पद प्रत्यक्ष फिल्डचे आहे. १२ तास ड्यूटी बजावताना दमछाक होते. पूर्व आणि मुख्य परीक्षेतून बैद्धिक चाचणी होऊन शारीरिक चाचणीतून योग्य उमेदवार निवडलॆ जात होते. अन्यायकारक आणि नुकसान करणारा हा निर्णय आहे.

- प्रा. कुमठाळे एम. एम. , शारीरिक मैदानी चाचणी, प्रशिक्षक.

चौकट----

समान संधी मिळणार

मैदानी चाचणी ज्या टप्प्यांवर घेतली जाते, त्यापैकी एका टप्प्यात उमेदवार अपात्र ठरला तर गुण कमी मिळाल्याने तो केवळ एका टप्प्यामुळे अंतिम निवडीतून बाहेर पडत होता. आता त्याला संधी मिळणार आहे. मैदानी चाचणी तर होणारच आहे. सर्वांना समान संधी असलेला फायदेशीर निर्णय आहे. असे एका माजी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: Mixed reaction to the decision to remove the field test eligibility for the post of ‘PSI’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.