Pune: राष्ट्रवादीच्या आमदाराला मतदारसंघातील ग्रामस्थांनीच केली 'गावबंदी'; बदनामी केल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 06:00 PM2023-07-28T18:00:00+5:302023-07-28T18:01:23+5:30
वाबळेवाडी ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभा व पालकसभा घेऊन गावबंदीचा निर्णय जाहीर केला...
शिक्रापूर (पुणे) :शिरुर तालुक्यातील वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेची चुकीची माहिती विधानसभेत देऊन शाळेची बदनामी केल्याचा आरोप करत आमदार अशोक पवार यांना वाबळेवाडी ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभा व पालकसभा घेऊन गावबंदीचा निर्णय जाहीर केला.
वाबळेवाडी शाळाप्रकरणी आज ग्रामस्थांनी तातडीने पालकसभा घेत आमदार अशोक पवार यांनी विधानसभेत शाळेचा प्रश्न चुकीच्या पद्धतीने मांडल्याचा आरोप करत त्यांचा निषेध केला. यापुढे वाबळेवाडीप्रकरणी पुन्हा बोलाल तर पुणे-नगर महामार्गावर त्यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन कारण्याचा इशाराही महिलांनी यावेळी दिला.
गुरुवारी राज्याच्या विधानसभा अधिवेशनात आमदार अॅड. अशोक पवार यांनी वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेत सर्रास २५ हजार प्रवेश फी घेऊन प्रवेश दिले जातात आणि मुख्याध्यापकांसह बाहेरील दोन व्यक्ती हे पैसे स्वीकारतात. याशिवाय सीएसआरमार्फत होणाऱ्या कामाच्या फंडाचा हिशोब जिल्हा परिषदेला देत नसल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय वाबळेवाडीची दहा-वीस मुले शाळेत असून, उर्वरित मुले धनदांडग्यांची आहेत, असे ते म्हणाले होते. ही सर्व माहिती राज्याची दिशाभूल करणारी व शाळेची अब्रू काढणारी विधानसभेत त्यांनी मांडल्याचे आरोप करत पालकांनी व ग्रामस्थांनी आज पालकसभा घेऊन आमदार पवार यांचा निषेध करत त्यांना गावबंदी करण्याचा निर्णय जाहीर केला.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप वाबळे, मल्हारी वाबळे, सतीश वाबळे, आबा वाबळे, नीलेश दिघे, मीनाक्षी चौधरी, सखुबाई वाबळे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वाबळे, बापू वाबळे, निवृत्ती वाबळे, सतीश कोठावळे, सुरेखा वाबळे, माजी सरपंच केशवराव वाबळे, डॉ. गणेश वाबळे, नानासाहेब वाबळे, वाबळे, कृष्णा सासवडे, कुंडलिक वाबळे, रेश्मा वाबळे, मल्हारी वाबळे, ताराबाई वाबळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.