आमदार अतुल बेनके यांच्या सुरक्षारक्षकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:10 AM2021-04-22T04:10:48+5:302021-04-22T04:10:48+5:30
सुरक्षारक्षकास दमदाटी व मारहाण करून आ. बेनके यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आमदार अतुल बेनके यांचे धाकटे बंधू अमित बेनके, सूरज ...
सुरक्षारक्षकास दमदाटी व मारहाण करून आ. बेनके यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आमदार अतुल बेनके यांचे धाकटे बंधू अमित बेनके, सूरज वाजगे व कार्यकर्त्यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात जाऊन सरपंच योगेश ऊर्फ बाबू पाटे यांचे समर्थक कपिल कानसकर व इतर ४ जणांविरुद्ध आज सकाळी प्रथम तक्रार दिली.
दरम्यान, नारायणगाव पोलिसांनी सर्व पुरावे तपासून आज (दि. २१) सायंकाळी सुरक्षारक्षक खंडेराव पानसरे यांची फिर्याद दाखल करून कानसकर व त्यांच्या चार अनोळखी साथीदारांच्या विरुद्ध भादंवि कलम ३९५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली. या घटनेबाबत अधिक माहिती देताना अमित बेनके म्हणाले की, कपिल कानसकर व त्याचे चार साथीदार हे दि. २० एप्रिल रोजी रात्री साडेअकराच्या दरम्यान बंगल्याच्या गेटवर आले. त्यांनी आमदार अतुल बेनके यांना शिवीगाळ करीत बंगल्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत होते. सुरक्षारक्षक खंडेराव पानसरे यांनी कपिल कानसकर व त्याच्या सहकार्यांना आत जाण्यास रोखले असता, कानसकर याने सुरक्षारक्षक खंडेराव दमदाटी करीत मारहाण करीत शर्टाचा खिसा फाडून खिशातील २०० रुपये, काही कागदपत्रे जबरदस्तीने घेऊन पसार झाले.
नारायणगावचे सरपंच योगेश ऊर्फ बाबू पाटे यांना एका मारहाण प्रकरणात न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात पाटे यांना जामीन होऊ शकला नसल्याने त्याचे खापर आमदार अतुल बेनके यांच्यावर फोडत आ. बेनके यांना शिवीगाळ करीत सुरक्षारक्षकाला मारहाण करून बंगल्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न कानसकर व त्यांच्या साथीदारांनी केला, असा आरोप आ. बेनके यांचे बंधू अमित बेनके यांनी केला आहे.
या घटनेने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नारायणगावचे विद्यमान सरपंच योगेश ऊर्फ बाबू पाटे यांच्या समर्थकांनी माझ्या बंगल्यावर येऊन अशा प्रकारचा धिंगाणा घालून बंगल्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणे कितपत योग्य आहे? सामाजिक काम करताना गावचे प्रथम नागरिक असणाऱ्या व्यक्तीच्या समर्थकांकडून झालेला प्रकार हा अतिशय निंदनीय आहे. माझ्या राहत्या घरी माझे आजारी वडील माजी आ. वल्लभशेठ बेनके, आई, पत्नी, भाऊ, मुले असे कुटुंब होते. पोलीस प्रशसानावर आपला विश्वास असून ते योग्य ती कारवाई करतील याची मला खात्री आहे? यामध्ये कुठलेही राजकीय हस्तक्षेप केली जाणार नाही, अशी प्रतिक्रिया आमदार अतुल बेनके यांनी व्यक्त केली.