PDCC Bank Election: आमदार दिलीप मोहिते जिल्हा बँकेवर जाणार बिनविरोध; शरद बुट्टे पाटलांची माघार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 17:33 IST2021-12-21T17:16:07+5:302021-12-21T17:33:47+5:30
जिल्हा बँकेच्या खेड शाखेत आमदार दिलीप मोहिते व शरद बुट्टे पाटील यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन माघारी बाबतची माहिती दिली...

PDCC Bank Election: आमदार दिलीप मोहिते जिल्हा बँकेवर जाणार बिनविरोध; शरद बुट्टे पाटलांची माघार
राजगुरूनगर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीतील सोसायटी अ गटातून जिल्हा परिषदेचे भाजपा गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी माघार घेतली. यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप मोहिते (dilip mohite) यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर झाला आहे.
अर्ज माघारीनंतर जिल्हा बँकेच्या खेड शाखेत आमदार दिलीप मोहिते व शरद बुट्टे पाटील यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन माघारी बाबतची माहिती दिली. सन २००५ मध्ये झालेल्या आरोपावरून आमदार मोहिते यांनी शरद बुट्टे पाटील यांच्या विरोधात येथील जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. कोणत्याही अटी, शर्ती शिवाय मोहिते यांनी हा खटला मागे घेतला. त्यावरून तडजोडी होऊन शरद बुट्टे पाटील यांनी आपला अर्ज मागे घेतला असे यावेळी सांगितले.
बाजार समितीचे माजी सभापती लक्ष्मण टोपे यांनी दोन्ही नेत्यांमध्ये यशस्वी मध्यस्थी घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून बुट्टे पाटील आणि आम्ही एकत्रित पणे समाजकारण केले आहे. त्यांचा जनसंपर्क आणि विकास कामे करण्याची हातोटी, चिकाटी व प्रामाणिकपणा यावरून त्यांना नजीकच्या काळात मोठ्या पदाची संधी मिळेल. तर आपण राजकीय एक्झिट घेण्याच्या पवित्र्यात असताना कोणत्याही प्रकारचा वाद-विवाद मागे ठेवायचा नाही असे ठरवले आहे, असे आमदार मोहिते म्हणाले.
राष्ट्रवादीचे हिरामण सातकर यांचा अर्ज या गटात आहे. मात्र तो माघारीच्या अंतिम दिवशी माघार होणार आहे. यावेळी जिल्हा परिषेदेचे माजी कृषी सभापती अरुण चांभारे, भाजपा युवामोर्चाचे तालुकाध्यक्ष काळूराम पिंजण, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुनील देवकर, माजी सरपंच दत्तात्रय मांडेकर, शिवाजी डावरे, युवानेते मयूर मोहिते, सचिन लांडगे आदी उपस्थित होते.