आमदार माधुरी मिसाळ यांचे दीर दीपक मिसाळ यांना जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 12:30 PM2022-09-25T12:30:00+5:302022-09-25T12:51:39+5:30
दीपक मिसाळ यांचा मोबाईल तसेच त्यांची भावजय आमदार माधुरी मिसाळ यांचा जनसंपर्कासाठीच्या संपर्क क्रमांकावर आरोपीने मेसेज केले
पुणे : आमदारमाधुरी मिसाळ यांच्या जनसंपर्कासाठी असलेल्या मोबाईलवर तसेच त्यांचे दीर व माजी नगरसेवक दीपक मिसाळ यांच्या मोबाईलवर मेसेज करुन ५ लाख रुपयांची खंडणी मागण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
याप्रकरणी माजी नगरसेवक दीपक धोंडिबा मिसाळ (वय ५६, रा. फेअर रोड, गोळीबार मैदान, कॅम्प) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन बिबवेवाडी पोलिसांनी इम्रान समीर शेख (रा. विकासनगर, घोरपडीगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १८ ते २३ सप्टेंबर दरम्यान घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपक मिसाळ यांचा मोबाईल तसेच त्यांची भावजय आमदारमाधुरी मिसाळ यांचा जनसंपर्कासाठीचा मोबाईल क्रमांक याच्यावर आरोपीने मेसेज केले. त्याने कधी २ लाख कधी ३ लाख तर कधी ५ लाख रुपयांची खंडणी मागणारे मेसेज केले. सुरुवातीला त्यांनी अशा मेसेजकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर या व्यातिरिक्त आणखी एका मोबाईल क्रमांकावर त्याने पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दीपक मिसाळ यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता़ त्यानंतर पोलिसांनी भा. द. वि. ३८६ आणि आय टी अॅक्ट कलम ६६ सी नुसार गुन्हा दाखल केला आहे. इम्रान शेख याच्याविरुद्ध आणखी एका प्रकरणात चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक हिवरकर तपास करीत आहेत.