आमदार पवार यांनी केले शिवले यांच्या धाडसाचे कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:07 AM2021-03-30T04:07:33+5:302021-03-30T04:07:33+5:30
शुक्रवारी (ता. २६) सायंकाळी बिबट्याने उसाच्या शेतातून घरी परतणाऱ्या मनीष शिवले यांच्यावर अचानक केलेल्या हल्ल्याला शिवले यांनी जोरदार प्रतिकार ...
शुक्रवारी (ता. २६) सायंकाळी बिबट्याने उसाच्या शेतातून घरी परतणाऱ्या मनीष शिवले यांच्यावर अचानक केलेल्या हल्ल्याला शिवले यांनी जोरदार प्रतिकार करीत आरडाओरडा करून बिबट्याला पळवून तर लावलेच परंतु त्याही स्थितीत घरी पळत जावून घरच्यांनाही सांगितले. या हल्ल्यात जखमी झालेल्या मनीष शिवले यांच्या डोक्याला, हाताला तसेच पायाला खोलवर जखमा झाल्या असून त्यांच्यावर कोरेगाव भीमा येथील श्रीकृष्ण हॉस्पिटलमध्ये डॉ. राजेंद्र शिवले यांनी तातडीचे उपचार केल्याने सध्या त्यांची प्रकृती सुधारली आहे. शेतकऱ्याला ५५ टाके पडल्याची माहिती डॉ. राजेंद्र शिवले यांनी दिली आहे. दरम्यान, या घटनेचे वृत्त समजताच आमदार ॲड. अशोक पवार यांनी मनीष शिवले यांची भेट घेऊन त्यांच्या धाडसाचे कौतुक तर केलेच. शिवाय याबाबत वन विभाग तसेच वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी चर्चा करुन बिबट्यांचा बंदोबस्त तसेच जखमींना शक्य त्या मदतीचे आश्वासनही दिले.
यावेळी डॉ. राजेंद्र शिवले, तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका डॉ. वर्षा शिवले, पंचायत समितीचे माजी सदस्य पी. के. गव्हाणे, वढुचे माजी सरपंच उदयोजक प्रफुल्ल शिवले, माजी सरपंच अंकुश शिवले, बाजीराव शिवले, सुभाष शिवले तसेच मनीष शिवले यांचे वडील सोसायटीचे संचालक आनंदा शिवले आदी उपस्थित होते.
नागरिकांनी खबरदारी घ्यावी
बिबट्याच्या हल्ल्यात मनीष शिवले हा तरुण जखमी झाला असून त्याला वनविभाग व वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्फत शक्य तेवढी अधिक मदत मिळवून देणार असून नागरिकांनी शेतात जाताना जमावाने जाण्याबरोबरच स्वरक्षणासाठी हातात काठी वापरण्याचे आवाहन आमदार अशोक पवार यांनी केले.
वनविभागाने गांभीर्याने घ्यावे
वढू बुद्रुक येथे बिबट्याने आतापर्यंत तीन जणांवर हल्ले केले असून नागरिकांना शेतात जाणेही जिकिरीचे होत आहे. वढूसह आसपासच्या गावांमध्येही जनावरे, कुत्री बिबट्याने खावून टाकली असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने गांभीर्याने दखल घेत बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी वढू बुद्रुकचे माजी सरपंच प्रफुल्ल शिवले यांनी केली आहे
वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे झकनाईच्या मळ्यात बिबट्याच्या हल्ल्याचा धाडसाने प्रतिकार करताना गंभीर जखमी झालेल्या मनीष शिवले या शेतकऱ्याची आमदार अशोक पवार यांनी भेट घेतली. यावेळी उपस्थित मान्यवर.