आमदार राहुल कुल यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 11:17 PM2018-10-01T23:17:26+5:302018-10-01T23:18:08+5:30
पुणे : आमदार राहुल कुल यांच्या गाडीला अपघात घडवून आणून त्यांना संपविण्याचा धमकीचा मेसेज पाठविणाऱ्या दोघांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. सागर विनायक भानवसे (वय २९, रा़ कवडेचा मळा, वरंवड) आणि आकाश राजेंद्र होले (रा़ गार फाटा, पाटस) अशी त्यांची नावे आहेत. या दोघांना असा मेसेज पाठविण्यास कोणी सांगितले होते का?, आमदार कुल यांचा खुनाचा कट कोणी रचला होता का, याचा तपास पोलीस करीत आहे.
याबाबत ग्रामीण पोलिसांनी सांगितले की, या दोघांनी पाटसमधील एका मोबाईल शॉपीमध्ये पश्चिम बंगाल येथील एका तरुणांची बनावट कागदपत्रांवरुन सीम कार्ड घेतले. त्यानंतर त्यांनी पुण्यातून जुना मोबाईल खरेदी केला. त्यानंतर आमदार राहुल कुल यांना संपविणार असलचा मेसेज टाईप करुन त्यांना पाठविला. त्यांनी हा मेसेज ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनाही पाठविला होता. हा मेसेज पाहून पाटील यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तपासाचा आदेश दिला. पोलीस निरीक्षक दयानंद गावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोबाईल नंबरवरुन तातडीने त्यांचा शोध घेऊन दोघांना अटक केली.
याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनी कोणाच्या सांगण्यावरुन हा मेसेज पाठविला, राहुल कुल यांना मारण्याचा कोणी कट रचला आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत. सोमवारी रात्री या प्रकाराची माहिती दौंड तालुक्यात पसरल्यानंतर कुल यांच्या कार्यकर्त्यांनी यवत पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. आमदार राहुल कुल हे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत दौंड तालुक्यातून राष्ट्रीय समाज पक्षाचे निवडून आलेले एकमेव आमदार आहेत.
राहुल कुल यांना पाठविलेल्या मेसेजमध्ये ते त्यांचा खुन कसा घडवून आणणार याचीही माहिती दिली होती. त्यात त्यांच्या गाडीला दुसरी मोठी गाडी धडकवून त्यांचा अपघात घडवून आणून संपविणार, त्यांच्या गाडीत स्फोटके ठेवून ती उडवून देणार अशा वेगवेगळ्या प्रकारे त्यांना संपविणार असल्याचे म्हटले होते. याबाबत राहुल कुल यांनी सांगितले की, पोलिसांचा तपास सुरू आहे. त्यामुळे सध्या या विषयावर आपल्याला काहीही बोलायचे नाही.