विधानसभा अध्यक्षपदासाठी आमदार संग्राम थोपटे यांचे नाव आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:08 AM2021-06-24T04:08:41+5:302021-06-24T04:08:41+5:30
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यामुळे विधानसभा अध्यक्षपद रिक्त झाले आहे. पटोले यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये आमदार संग्राम थोपटे, ...
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यामुळे विधानसभा अध्यक्षपद रिक्त झाले आहे. पटोले यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये आमदार संग्राम थोपटे, आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, आमदार सुरेश वरपूडकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत.
सुरेश वरपूडकर हे काँग्रेसचे मराठवाड्यातील ज्येष्ठ नेते आहेत. तर आमदार संग्राम थोपटे काँग्रेसचे जेष्ठ निष्ठावंत नेते माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे चिरंजीव असून सलग तीनवेळा विधानसभेत निवडून आले आहेत. शिवाय मागील मंत्रीमंडळ विस्तारात मंत्रिपदाची संधी हुकली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे भोर-वेल्हा-मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांचे नाव आघाडीवर आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचेही नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी नावाची चर्चा असून यामुळे राष्ट्रवादी तसेच शिवसेना या महाविकास आघाडीतील घटक पक्षांना वेसण घालण्याचे काम उत्तम पद्धतीने करू शकतील, असा काँग्रेस नेत्यांचा होरा आहे. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांना राष्ट्रवादीकडून विरोध होऊ शकतो. त्यामुळे अध्यक्षपदासाठी आमदार संग्राम थोपटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल अशीच चर्चा आहे.