"दादा आमचे फोटो लावा काही हरकत नाही", आमदार शिरोळेंच्या मतदारसंघातील महिलांनी दर्शवला पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 01:25 PM2024-07-31T13:25:35+5:302024-07-31T13:28:32+5:30
परवानगी न घेता या महिलेचा फोटो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या बॅनरवर लावल्याचा आरोप करत महिलेने केली होती तक्रार
पुणे : भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ अनिल शिरोळे यांच्या विरोधात एका महिलेने पोलिसात तक्रार दिली होती. परवानगी न घेता या महिलेचा फोटो जाहिरात फलकावर छापल्याने या महिलेने तक्रार दिली होती. पुण्याचे पोलीस आयुक्त यांच्या नावाने असलेला हा तक्रार अर्ज या महिलेने सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याकडे दिला. त्यानंतर रंजनकुमार शर्मा यांनी संपूर्ण प्रकरणाचे चौकशीचे आदेश दिले होते. या प्रकरणावरून आमदार शिरोळेंनी खुलासा करत स्पष्टीकरणही दिले होते. ज्या फोटोग्राफरने हे फोटो काढले होते त्याची परवानगी घेऊनच हे फोटो वापरले असल्याचे त्यांनी सांगितले होते.
आज त्यांच्या मतदारसंघातील महिलांनी आंदोलन करत सिद्धार्थ शिरोळे यांना पाठिंबा दर्शवला आहे. दादा आमचे फोटो लावा आमची काही हरकत नाही. असे म्हणत महिलांनी शिरोळेंना विनंती केली आहे. आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फ्लेक्स लावले आहेत. या फ्लेक्सवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह सिद्धार्थ शिरोळे यांचा देखील फोटो आहे. त्यासोबतच या फोटोमध्ये नात्यांचा मान, माय बहिणचा सन्मान अशा मथळ्याखाली दोन महिलांचा देखील फोटो छापण्यात आला. आणि याच फोटो वरून आमदार सिद्धार्थ शिरोळेविरोधात पोलिसात तक्रार देण्यात आली.
या अर्जामध्ये राज्याचे मुख्यमंत्री यांच्या लाडकी बहीण या योजनेला धरून आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विनासंमती माझे खाजगी फोटो मोठ्या प्रमाणात शिवाजीनगर पुणे भागात मोठ्या प्रमाणात छापले. हे फोटो प्रसिद्ध झाल्याने माझ्या कुटुंबात गैरसमज आणि वादविवाद सुरू झाले आहेत. अयोग्य चुकीचे मनमर्जी आणि बोगस काम केलेले शिरोळेबद्दल लेखी तक्रार देत आहे. अशा आशयाची तक्रार देण्यात आली होती.
शिरोळेंनी दिले स्पष्टीकरण
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रसार व्हावा आणि महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळावेत या हेतूने ते फ्लेक्स लावण्यात आले होते. या फ्लेक्सवर ज्या महिलांचे फोटो वापरण्यात आले होते त्याची आधीच परवानगी घेतली होती. जाहिरात एजन्सीच्या माध्यमातून, परवानगी घेऊन आणि रीतसर पैसे भरूनच त्या फोटोचा वापर करण्यात आला होता. २०१६ साली हा फोटो काढण्यात आला होता. ज्या छायाचित्रकाराने हा फोटो काढला त्याची परवानगी घेऊनच जाहिरात एजन्सीच्या मार्फत हा फोटो वापरण्यात आला आहे. जाहिरातीत हा फोटो वापरण्यामागे ही जाहिरात लोकांपर्यंत पोहोचवणे हाच उद्देश आहे. तरीसुद्धा हा फोटो वापरल्याने त्या महिलांना वेदना झाली असतील तर दिलगिरी व्यक्त करत असल्याचे शिरोळेंनी सांगितले आहे.
महिलांनी दर्शवला पाठिंबा
आमदार शिरोळेंच्या विरोधात त्या महिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर आज शिरोळेंच्या मतदारसंघातील महिलांनी शिरोळेंना पाठिंबा दर्शवला. त्यांनी लाडक्या बहिणींच्या लाडक्या भावाकडे बॅनरवर फोटो टाकण्यासाठी आग्रह धरला. तसेच त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात माता भगिनींच्या वतीने निवेदन देण्यात आले.