मोटारीवर आमदार स्टिकरप्रकरणी गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 02:18 AM2018-05-11T02:18:17+5:302018-05-11T02:18:17+5:30
महाराष्ट्र विधानसभा सदस्य म्हणून स्टिकर लावून फिरणाऱ्या सणसवाडी (ता. शिरूर) येथील गोरक्ष किसन भुजबळ यांच्यावर शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ज्या आमदारांनी त्यांना स्टिकर दिलेत, त्या आमदारांनी असे किती आणि कुणाकुणाला स्टिकर वाटले, याचीही माहिती घेण्यास शिक्रापूर पोलिसांनी सुरुवात केली आहे.
शिक्रापूर - महाराष्ट्र विधानसभा सदस्य म्हणून स्टिकर लावून फिरणाऱ्या सणसवाडी (ता. शिरूर) येथील गोरक्ष किसन भुजबळ यांच्यावर शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ज्या आमदारांनी त्यांना स्टिकर दिलेत, त्या आमदारांनी असे किती आणि कुणाकुणाला स्टिकर वाटले, याचीही माहिती घेण्यास शिक्रापूर पोलिसांनी सुरुवात केली आहे. अशा प्रकारे गुन्हा दाखल होण्याची पुणे जिल्ह्यातील पहिली घटना आहे.
काही दिवसांमध्ये खेड तालुक्यात महाराष्ट्र विधानसभा सदस्य असे स्टिकर लावून अनेक गाड्या फिरत होत्या. शिरूर तालुक्यात अशा पद्धतीने (एमएच १२ एमएफ ००४७) या क्रमांकाची मोटार फिरत असल्याचे निदर्शनास आले.
पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी बेकायदा स्टिकर लावून फिरत असलेले गोरक्ष भुजबळ यांना ताब्यात घेतले.
भुजबळ हे सणसवाडीच्या माजी सरपंच गीता भुजबळ यांचे पती आहेत. त्यांच्यावर भारताची
राजमुद्रा अयोग्य वापरास प्रबंध कायदा २००५ कलम ४ व ७ प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुजबळ यांच्यावर अटकेची कारवाई केली जाणार असल्याची माहिती निरीक्षक गिरीगोसावी यांनी दिली.
पोलिसांनी ही मोटार ताब्यात घेतली आहे. ही मोटार भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी काही दिवस वापरण्यासाठी घेतली होती. त्यांनीच मोटारीला स्टिकर लावल्याची माहिती गोरक्ष भुजबळ यांनी दिली. आमदारांसाठी असलेले स्टिकर नेमके कुणी वाटले आणि किती वाटले, याची नेमकी माहिती संकलित करण्याचे कामही सुरू केल्याचे गिरीगोसावी यांनी सांगितले.
याबाबत पोलीस नाईक तेजस रासकर यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार देविदास दगडे हे करीत आहे.