आमदार सुरेश धस यांना आधी करावे लागले आंदोलन; नंतर मिळाले शरद पवारांच्या बैठकीचे निमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 03:11 PM2020-10-27T15:11:26+5:302020-10-27T17:05:12+5:30
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत इन्स्टिट्यूटमध्ये ऊसतोडणी कामगारांच्या प्रश्नावर बैठक होत आहे.
पुणे: ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मांजरीतील वसंतदादा इन्स्टिट्यूटमध्ये ऊसतोडणी कामगारांच्या प्रश्नावर बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातील आणि राष्ट्रवादीतील दिग्गज नेते उपस्थित राहणार होते. पण या बैठकीच्या केवळ काही तास आधी नेते सुरेश धस यांना फोनवरून या बैठकीला उपस्थित राहता येणार नसल्याचा निरोप कळवण्यात आला. त्यानंतर धस यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आक्रमक पवित्रा धारण करत शुगर इन्स्टिट्यूटच्या प्रवेशद्वारावरच जोरदार घोषणाबाजी देत आंदोलन सुरु केले. यामुळे काही काळ परिसरात गोंधळ उडाला. पण थोड्याच वेळात आतमधून धस यांना बैठकीला आमंत्रित करण्यात आले. यानंतर आंदोलन मागे घेत ते बैठकीला हजर झाले.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत इन्स्टिट्यूटमध्ये ऊसतोडणी कामगारांच्या प्रश्नावर बैठक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष मंत्री जयंत पाटील, मंत्री धनंजय मुंडे, मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह अनेक नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. मजुरीत वाढ तसेच कोरोना सुरक्षा कवच अशा मागण्यांवर कामगार संघटना अडून बसल्या आहेत. पवार यांचे १ वाजता संस्थेत आगमन झाले. त्यांनी काही कामगार संघटनांच्या फक्त अध्यक्षांबरोबर व तेही एक एक अशी चर्चा सुरू केली.
आमदार सुरेश धस यांनी मांजरीतील वसंतदादा शूगर इन्स्टिट्यूटच्या प्रवेशद्वारातच मोजक्याच कामगार नेत्यांंना चर्चेसाठी न बोलावले म्हणून मंगळवारी सकाळी उपोषण सुरू केले. शिवशाहू ऊसतोडणी कामगार संघटना व अन्य संघटनांचे प्रतिनिधीही त्यांच्यासमवेत होते.
धस म्हणाले, राज्यात १३ लाख ऊस तोड कामगार आहेत. त्या सर्वांचे प्रश्न मांडण्यासाठी या बैठकीला उपस्थित राहणार होतो. मात्र काही तास अगोदर मला निरोप दिला गेला की, तुम्हाला बैठकीला उपस्थित राहता येणार नाही. या सर्व प्रकारानंतर एक गोष्ट ठळक होत आहे ती म्हणजे आतमध्ये फक्त हो ला हो करणारेच हवे आहेत. बैठकीला न बोलवून दडपशाही आणि मुस्कटदाबीचा प्रकार सुरु आहे. तसेच आमच्या जिल्ह्यातील काही लोक आतमध्ये आहेत. या बैठकीनंतर त्यांना झाल्याप्रकाराचा जाब विचारा. आज बैठकीत आवाज उठवू दिला नाही. तरी हरकत नाही. यापुढे मी उसाच्या फडात जात प्रत्यक्ष कामगारांसोबत चर्चा करून त्यांच्या प्रश्नांसंबंधी आवाज उठवणार आहे.
यावेळी धस यांनी सर्वांनाच बैठकीला बोलवा असा आग्रह धरला. तो मान्य होत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी उपोषण सुरू केले. अन्य संघटनाही त्यात सामील झाल्या. दरम्यान माजी मंत्री व मजुरीत दरवाढ प्रश्नावर सरकारने नियुक्त केलेल्या लवादाच्या सदस्या पंकजा मुंडे तिथे आल्या. त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न झाला. पण गाडीसह त्या आतमध्ये गेल्या. थोड्या वेळाने धस यांनाही आतून बोलावणे आले. तेही आत गेले. त्यानंतर आंदोलन थांबले.
जलसंधारण मंत्री जयंत पाटील हेही लावादाचे सदस्य आहेत. मात्र ते आलेले नव्हते. पवार यांची संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा सुरू आहे. साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर तसेच अन्य संचालकही बैठकीला उपस्थित आहेत. आजच ऊस तोडणी कामगारांच्या मजुरीतील दरवाढ तसेच अन्य मागण्यांवर निर्णय होण्याची शक्यता आहे.