निधी आमदाराचा, पळविला स्थायी समितीने?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:12 AM2021-03-27T04:12:01+5:302021-03-27T04:12:01+5:30
पुणे : एरवी नगरसेवकांकडून वर्गीकरणाद्वारे निधी पळविण्याच्या घटना घडत होत्या. मात्र, आता चक्क आमदारांचाच निधी पळविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस ...
पुणे : एरवी नगरसेवकांकडून वर्गीकरणाद्वारे निधी पळविण्याच्या घटना घडत होत्या. मात्र, आता चक्क आमदारांचाच निधी पळविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनीच प्रभागातील विकासकामांसाठी कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आणि नगरसेविका मुक्ता टिळक यांनी अंदाजपत्रकात सुचविलेला निधी पळविला असल्याचा प्रकार समोर आला आहे. टिळक यांनी याबाबत पालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे लेखी पत्राद्वारे तक्रार केली आहे.
आमदार टिळक या नगरसेविकाही आहेत. त्यांनी पत्र देत पालिकेच्या २०१०-२१ च्या अंदाजपत्रकात कसबा विधानसभा मतदारसंघात विविध भागात सीसीटीव्ही बसविण्याचे दोन कोटींचे काम प्रस्तावित केले होते. त्यानुसार, प्रायोगिक तत्वावर सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याच्या कामाचा समावेश करण्यात आला.
या कामाला आयुक्तांची मान्यता घेण्यासाठी दोन तुकडे करत विद्युत विभागाने एक-एक कोटींची दोन पुर्वगणकपत्र तयार केली. त्यालाच आमदार टिळक यांनी आक्षेप घेत एका कामासाठी एकच निविदा काढा अशी मागणी आयुक्तांकडे केली होती. विद्युत विभागाने टिळक यांची तक्रार आल्यानंतर हा प्रस्ताव बाजूला ठेवत अंमलबजावणी केली नाही.
दरम्यान टिळक यांनी आमदार निधीतून ८० लाखांचा निधी डीपीडीसी मधून दिला. त्याची खरेदी प्रक्रीया सुरू असतानाच; स्थायी समितीमध्ये दोन नगरसेविकांनी यातील एक कोटी रूपयांच्या वर्गीकरणाचा प्रस्ताव दिला. त्यानुसार, हा निधी पुन्हा कसबा विधानसभा मतदारसंघात सीसीटीव्ही बसविण्याच्या कामासाठी देण्यात आला. यामध्ये पोलीस ठाण्यांसह चौक्यांची नावे वाढविण्यात आली. त्याच वेळी विद्युत विभागाने निविदा प्रक्रीया राबवून ८८ लाखांच्या कामाचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये दाखल मान्य करून घेतला. मुख्यसभेत हे एक कोटींचे वर्गीकरणही मंजूर करण्यात आले आहे.
या सर्व गोंधळाची माहिती मिळताच टिळक यांनी तातडीनं आयुक्तांना पत्र पाठवित तुकडे करून निविदा काढू नये अशी मागणी केली. मुख्यसभेतील वर्गीकरणाचा विषय मंजूर करू नये अशी मागणी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.