महाविकास आघाडी सरकारचे आमदारच असुरक्षित; तर सर्व सामान्य जनतेचे काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 03:45 PM2021-12-12T15:45:55+5:302021-12-12T17:06:40+5:30
शिरूर - हवेली मतदार संघातील सर्वपक्षीय नागरीकांनी आमदार अशोक पवार यांना दिलेल्या धमकीचा निषेध करत आरोपी चा तात्काळ शोध घेऊन कारवाई करण्याची व आमदार पवार यांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी निवेदनाव्दारे पोलीस प्रशासनाकडे केली
शिरूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात सत्तेतील आमदारच असुरक्षित तर सर्व सामान्य जनतेचे काय? असा प्रश्न शिरुर हवेली मतदारसंघांतील नागरिकांमध्ये चर्चिला जात आहे. शिरूर - हवेलीचे आमदार अँड. अशोक पवार यांना सुमारे दोन महिन्यापूर्वी निनावी पत्राव्दारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
याबाबत मतदार संघातील सर्वपक्षीय नागरीकांनी आमदार अशोक पवार यांना दिलेल्या धमकीचा निषेध करत आरोपी चा तात्काळ शोध घेऊन कारवाई करण्याची व आमदार पवार यांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी निवेदनाव्दारे पोलीस प्रशासनाकडे केली. जनमताचा रेटा पहात आमदार अशोक पवार यांना पोलीस कर्मचारी संरक्षणा साठी देण्यात आले. या घटनेला दोन महिने होत आले आहेत. परंतु लाखो नागरिकांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या शिरुर हवेलीतील आमदार अशोक पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीं चा शोध लागला नाही का? हा गृह खात्याचा हलगर्जीपणा का? पोलीस प्रशासनाचे तपास कार्यातील अपयश याबाबत संभ्रम आहे.
लोकप्रतिनिधीची ही अवस्था तर सर्व सामान्य जनतेचे काय? सर्व सामान्य नागरीकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडुन हे पोलिस प्रशासन न्याय देईल काय? असा सवाल जनसामान्य नागरिक करत आहेत. त्यामुळे या प्रकरणातील आरोपी तात्काळ उघड होऊन पोलीस प्रशासनाने जनसामान्यांच्या प्रति विश्वासार्हता टिकून राहण्यासाठी कारवाई होणे गरजेचे असल्याचे मत जाणकार नागरिक व्यक्त करत आहेत.