डॉ. सुश्रुत घैसास यांना ‘एमएमसी’ची नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 07:40 IST2025-04-12T07:39:32+5:302025-04-12T07:40:02+5:30
Dr. Sushrut Ghaisas News: वेळेवर उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमएमसी) दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे प्रसूतीतज्ज्ञ डॉ. सुश्रुत घैसास यांना गुरुवारी नोटीस बजावली. डॉ. घैसास यांच्याकडून सर्व तपशील मागविण्यात आला आहे.

डॉ. सुश्रुत घैसास यांना ‘एमएमसी’ची नोटीस
मुंबई - वेळेवर उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमएमसी) दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे प्रसूतीतज्ज्ञ डॉ. सुश्रुत घैसास यांना गुरुवारी नोटीस बजावली. डॉ. घैसास यांच्याकडून सर्व तपशील मागविण्यात आला आहे.
पुणे येथील घटनेचे राज्यभर पडसाद उमटले आहेत. गेल्या आठवड्यात एमएमसीने पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस पाठवून महिलेच्या उपचार प्रक्रियेत किती डॉक्टर सहभागी होते, याची माहिती मागवली होती. त्यानंतर एमएमसीच्या नोटिसीला उत्तर देताना डॉ. घैसास या महिलेच्या उपचारात समाविष्ट असल्याचे सांगण्यात आले आहे. रुग्णालयाच्या आलेल्या प्रतिसादाच्या आधारे एमएमसीने डॉ. घैसास यांना नोटीस काढली आहे. रविवारपर्यंत डॉ. घैसास यांच्याकडून माहिती येणे अपेक्षित आहे. त्यानंतर मंगळवारी त्यांना सुनावणीसाठी एमएमसीच्या कार्यालयात बोलविण्यात येईल, असे एमएमसीचे प्रशासक डॉ. विंकी रुघवानी यांनी सांगितले.
‘दीनानाथ’चे कार्यकारी मंडळ बरखास्त करा
पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे कार्यकारी मंडळ सरकारने बरखास्त करावे, रुग्णालय जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चालवावे, डॉ. धनंजय केळकर यांच्यासह दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
सपकाळ यांनी शुक्रवारी तनिषा भिसे यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.