‘एमएनजीएल’कडून पुन्हा सीएनजी दरवाढ; वाहनचालकांना बसणार आर्थिक झळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 17:02 IST2024-12-29T17:01:53+5:302024-12-29T17:02:06+5:30
पुण्यातील सीएनजीच्या दरात १ रुपया १० पैसे प्रतिकिलोची वाढ झाली असून त्यात उत्पादन शुल्क आणि राज्य कर समाविष्ट आहे

‘एमएनजीएल’कडून पुन्हा सीएनजी दरवाढ; वाहनचालकांना बसणार आर्थिक झळ
पुणे : गेल्या महिन्यात सीएनजीच्या दरात २ रुपयांनी वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा १ रुपये १० पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना आर्थिक झळ बसणार आहे. जागतिक बाजारात डॉलरची किंमत वाढल्यामुळे महाराष्ट्र नैसर्गिक वायू लिमिटेडने (एमएनजीएल) पुन्हा सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
नैसर्गिक वायूच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ही दरवाढ करण्यात येत असल्याचे एमएनजीएलचे म्हणणे आहे. ऑपरेशनल क्षमता आणि ग्राहकांच्या परवडण्याची शक्यता यांचा समतोल राखण्यासाठी एमएनजीएलने या वाढीचा काही भाग स्वत: काढून घेतला आहे. परिणामी, पुण्यातील सीएनजीच्या दरात १ रुपया १० पैसे प्रतिकिलोची वाढ झाली आहे. ज्यात उत्पादन शुल्क आणि राज्य कर समाविष्ट आहे. जे एकूण वाढीचा सुमारे १५ टक्के भाग आहे. या बदलामुळे एमएनजीएलच्या ग्राहकांच्या हिताची सर्वोच्च प्राथमिकता आणि वायू पुरवठ्यातील अखंडता कायम राहील, हे स्पष्ट होते. या किरकोळ वाढीच्या बाबतीत देखील सीएनजी हे पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत अद्यापही सर्वात किफायतशीर आणि पर्यावरणपूरक इंधन आहे. परंतु सातत्याने हाेणाऱ्या दरवाढीमुळे त्याचा वाहनधारकांना आर्थिक झळ बसत आहे.
सातत्याने दरवाढ
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. याचा वाहनधारकांना मोठ्याप्रमाणत फटका सहन करावा लागत असल्याने अनेक नागरिक आता 'सीएनजी' वाहनांकडे वळले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या दरात सातत्याने वाढ करण्यात येत आहे. सध्या शहर परिसरात सीएनजी ८७.९० रुपये प्रतिकिलोने मिळत आहे. यात आता १ रुपया १० पैशांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे एक किलो सीएनजी गॅससाठी प्रतिकिलो ८९ रुपये मोजावे लागणार आहे.
वाहनधारकांना आर्थिक फटका
शहरात सीएनजीवर धावणाऱ्या वाहनांची संख्या सुमारे तीन ते चार लाखांवर आहे. यात चारचाकी कारची संख्या सर्वाधिक आहे. यानंतर रिक्षा, पीएमपीएल बसेससह अन्य वाहनांचा समावेश आहे. सध्या पीएमपीएलच्या ताफ्यात जवळपास ८०० बसेस या सीएनजीवर चालणाऱ्या आहेत. यामुळे अशा वाहनचालकांना याचा फटका बसणार असून, वाढीव दराने गॅस खरेदी करावा लागणार आहे.