‘ॲमेझॉन’ तोडफोड प्रकरणी मनसे कार्यकर्ते अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:16 AM2020-12-30T04:16:43+5:302020-12-30T04:16:43+5:30
पुणे : कोंढव्यातील ॲमेझॉन कार्यालयाच्या गोदामात शिरुन तोडफोड करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेेनेच्या ८ कार्यकर्त्यांना कोंढवा पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने ...
पुणे : कोंढव्यातील ॲमेझॉन कार्यालयाच्या गोदामात शिरुन तोडफोड करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेेनेच्या ८ कार्यकर्त्यांना कोंढवा पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांची एक दिवसाच्या पोलीस कोठडीत रवानगी केली.
अमित जगताप (वय ४०), सौरभ टिळेकर (वय २२), रोहित सोनावणे (वय ३०), मयुर जगताप (वय २७), आकाश आवटे (वय २४), अक्षय जगताप (वय २५), मयुर चव्हाण (वय २८), निखिल जगताप (वय २७, सर्व रा. कोंढवा बुद्रुक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
ॲमेझॉनवर मराठीचा वापर करावा, या मागणीसाठी मनसे कार्यकर्त्यांनी २५ डिसेंबरला सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ॲमेझॉनच्या कोंढव्यातील गोदामात शिरुन तोडफोड केली होती. कोंढवा पोलिसांनी सोमवारी रात्री या ८ जणांना अटक केली. सर्वांना आज लष्कर न्यायालयात हजर केले. आरोपी गुन्हा घडल्यापासून फरार होते. आरोपींना मोकळे सोडल्यास ते अशाच प्रकारचे गुन्हे करुन सार्वजनिक शांतता बिघडविण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांना अटक करणे गरजेचे होते, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. आरोपीच्या वतीने ॲड. रुपाली पाटील, ॲड. विजय ठोंबरे यांनी काम पाहिले. पोलिसांची मागणी ग्राह्य धरुन न्यायालयाने सर्वांची एक दिवस पोलीस कोठडी मंजूर केली.